रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून करोनाबाधित रूग्ण आढळून येण्याचा उच्चांक शुक्रवारी नोंदवला गेला असून त्यातही रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात या रोगाचा जास्त संसर्ग आढळून आला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण ३५ करोनाबाधित रूग्ण सापडले असून त्यापैकी १५ रत्नागिरी तालुक्यातील, तर चिपळूण तालुक्यातील १० रूग्ण आहेत. उरलेले रूग्ण राजापूर, लांजा, खेड आणि दापोली तालुक्यातील आहेत.

रत्नागिरी शहर व परिसरात मारूती मंदिर, चर्माालय, भाटय़े, शिरगाव, समर्थनगर, राजीवडा या ठिकाणी प्रत्येकी १ रूग्ण आढळून आले आहेत, तर उरलेले ग्रामीण भागातील आहेत. यापूर्वीही राजीवडा आणि साखरतर या ठिकाणी करोनाबाधित रूग्ण सापडले होते. ते उपचारानंतर बरे झाले आहेत.

चिपळूण शहरासह तालुक्यातील करोनाबाधित रूग्ण बरे होत असतानाच नव्या रूग्णांची संख्या अचानक वाढती आहे. तालुक्यातील फुरूस येथे ६, कापसाळ पायरवाडी २, व चिपळूण शहरात बुरूमतळी १ असे १० रूग्ण नव्याने आढळले. दरम्यान या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.

शहरालगतच्या कापसाळ पायरवाडी येथे दोन दिवसापुर्वी एक करोनाबाधित रूग्ण आढळून आला होता तर त्याच्या संपर्कात एकूण ९ जण आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीला पाठवले असता त्यातील दोघे पॉझिटिव्ह निघाले आहेत. शहरातील गुहागर नाक्यात आढळलेल्या एका दाम्पत्याच्या संपर्कात ६८ जण आले होते. यामध्ये कापसाळ येथील काही लोकांचा समावेश आहे. त्यांचेही स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील फुरूस येथे काही दिवसापुर्वी एक रूग्ण आढळला होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकाच कुटुंबातील ६ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. हे लोक १५ दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आल्यानंतर ते घरीच अलगीकरण करून राहत होते. तो कालावधी संपल्यानंतर ते बाधितांच्या संपर्कात आल्याने फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीला गेले. तेथून त्यांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या लोकांच्या संपर्कात इतर २२ व्यक्ती आल्या आहेत. त्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.  ओवळी येथे आढळलेली करोनाबाधित व्यक्ती बदलापूर येथून २१ जूनला गावी आली होती. त्यांना २४ जून रोजी सर्दी, ताप जाणवू लागल्याने ते तपासणीासाठी दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखले झाले. त्याच दिवशी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. कामथे रूग्णालयात उपचार करून त्याना पेढांबे करोना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तर शहरातील बुरूमतळी येथे आढळलेली व्यक्ती १५ जूनला मुंबईतून घरी आली होती. ते घरीच अलगीकरण करून राहत होते. त्यांचे मेहुणे रत्नागिरी येथे पॉझिटिव्ह आल्याने व त्या दोघांची एकत्रित भेट झाल्याने ते कामथे उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले. २४ रोजी त्यांचा स्बॅब घेण्यात आला. त्यानंतर २६ रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तहसीलदार जयराज सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, पोलीस निरीक्षक देंवेद्र पोळ यांनी या तिन्ही गावात भेट देऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. आमदार शेखर निकमांनी फुरूस ला भेट देत आढावा घेतला.

दरम्यान याच कालावधीत २० करोनाबाधित रूग्ण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आजतागायत  बरे झालेल्या  रुग्णांची संख्या ४२० झाली आहे, तर १११ करोनाबाधित रूग्णांवर उपचार चालू आहेत.