सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एका परिचारिकेला करोनाची लागण झाली असून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्या सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेल्या १२३ करोना तपासणी अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटीव्ह, तर १२० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह तीन रुग्णांपैकी  देवगड, कणकवली आणि मालवण तालुक्यातील प्रत्येकी १ रूग्ण आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ झाली असून बाधितांपैकी ७ रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. जिल्ह्यात सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या व्यतिरिक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १६४ संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, ४२ रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आणि कोविड केअर सेंटरमध्ये ३८ रुग्ण आहेत. अजून २३६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

जिल्ह्यात एकूण २७ हजार ५०७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ४२८ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत, तर २५ हजार ८९५ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

नागरीक्षेत्रात १ हजार १८४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत, तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी ६ हजार १६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. २ मेपासून एकूण ५८ हजार ८२५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.