पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तीन वर्षीय मुलीला करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले  आहे. या मुलीच्या थुंकीचे नमुने सुमारे आठवडाभरापासून चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्याचे अहवाल आठवडाभरानंतर आल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

वीटभट्टी वरील कामगाराची ही मुलगी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. बाधित मुलीच्या वडिलांना अलगीकरण करून ठेवण्यात आले असून मुलगी व आईवर डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यभरात करोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  मुंबईत करोनाचे १५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १५४९ झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत करोनाची बाधा झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४३ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.