युद्ध असले तरीही निवडणुका घेतल्याच पाहिजेत असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. एवढंच नाही तर करोना हे सरकारचं नाटक असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. करोनाच्या नावाने सरकार आपलंच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.

मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर राजकीय प्रशासक नेमणुकीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला आहे. राजकीय पक्षांनी दुकानदारी उघडल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पत्राचा दाखला देत प्रशासक नेमणुकीसाठी ११ हजार रुपयांचा पक्ष निती घेऊन दुकानदारी सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाची शपथ घेतलेल्या व्यक्तीलाच प्रशासक म्हणून नेमता येतं ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासकांच्या नेमणुका राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये, यासाठी आंबेडकर यांनी विनंती केली.