राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वार काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. लॉकडाउन नको असेल तर नियम पाळा. येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल.असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.