’ पीपीसीआर हा स्वयंसेवी समूह कसा स्थापन झाला?

गेल्या मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव देशात सुरू  झाल्यावर चीन, अन्य देशांतील परिस्थिती पाहून करोना हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट ठरणार असल्याची जाणीव झाली. त्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे समाज म्हणून, उद्योग क्षेत्र म्हणून आपण काहीतरी करायला हवे हा विचार पुढे आला. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मदत करण्यापासून पीपीसीआरचे काम सुरू झाले. त्यानंतर बाकी लोकही आमच्यासोबत येत गेले. समूहात रुग्णालये, उद्योग क्षेत्र, शास्त्रज्ञ, प्रशासन जोडत जाऊन सदस्यसंख्या पाचशेपेक्षा अधिक झाली. समूहातील सर्व सदस्य आपापले कौशल्य घेऊन येतात. त्यामुळे सगळ्यांची कौशल्य एकमेकांना पूरक ठरतात.

’ पीपीसीआरने प्रशासनाला कोणत्या पद्धतीने मदत केली, प्रशासनाने पीपीसीआरला काय मदत केली?

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात प्रशासन व्यग्र असल्याने त्यांना मदत करण्याचे आमचे काम आहे. काही बाबतीत प्रशासन झटपट निर्णय घेऊ शकत नाही. त्यांना ठरावीक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, निविदा काढव्या लागतात. मात्र आम्ही नागरिक म्हणून काही गोष्टी वेगाने करू  शकतो. पीपीसीआरचे पूर्ण काम स्वयंसेवी आहे. याचे कारण लोकांना काहीतरी करायचे आहे, त्यांना समाजासाठी देण्याची इच्छा आहे. एकमेकांची मते समजून घेऊन समूहात निर्णय घेतला जातो. मला नाही वाटत, देशातील अन्य कुठल्या शहरात असे काम झाले असेल. शहराला करोनामुक्त करण्याव्यतिरिक्त, आपले आयुष्य पूर्वपदावर आणण्याव्यतिरिक्त आमची काहीही भूमिका नाही, मागणी नाही.

’ पीपीसीआरने कशा पद्धतीने काम के ले?

सर्वात पहिल्यांदा आम्ही रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ५० हजार स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट), मुखपट्टय़ा पुरवल्या. ३०० कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर), १५० हाय फ्रिक्वेन्सी नेजल प्राणवायू उपलब्ध करून दिले. स्थानिक पातळीवरच कृत्रिम श्वसन यंत्रणा विकसित केली. त्यानंतर शहरातील स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन अन्न वाटप केले. तिसरे काम म्हणजे टप्प्याटप्प्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यतील रुग्णालयांची क्षमता वाढवत दिल्ली, मुंबईपेक्षा जास्त केली. प्रशासन-रुग्णालयांमध्ये दुवा म्हणून काम केले. रुग्णालयांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.

’ प्राणवायूचा तुटवडा करण्यासाठी कसे प्रयत्न झाले?

प्राणवायूचा तुटवडा होणारच आहे याची जाणीव झाल्याने हा तुटवडा कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आमच्या व्हॉट्सअ‍ॅपस समूहावर औरंगाबादच्या कं पनीकडे १२ प्लांट उपलब्ध असल्याची माहिती आली. त्यामुळे तातडीने त्या कंपनीशी बोलून आम्ही ते प्लांट विकत घ्यायचा निर्णय घेतला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली, प्रशासन, खासगी कंपन्यांकडून निधी उपलब्ध केला. २४ तासांत १२ प्लांटसाठी जवळपास १२ कोटींचा निधी उभा करून ते विकत घेतले. या वेगाने प्रशासनाला काम करणे शक्य झाले नसते. तसेच प्राणवायूच्या उपलब्धतेचा दुसरा काहीच पर्याय समोर दिसत नसल्याने सिंगापूर सरकारच्या कंपनीला संपर्क साधला. त्यांनी मागच्या लाटेवेळी घेऊन ठेवलेले प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर, कृत्रिम श्वसन यंत्रणेचा साठा देण्याची विनंती के ली. त्याला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ५० टक्के  खर्च अनुदानाच्या स्वरुपात देण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. मात्र बाकीची ५० टक्के  रक्कम, म्हणजे ३० कोटी रुपये नक्कीच मोठी होती. पण पुणे शहर पाठीशी उभे राहील या विश्वासाने साहित्याची मागणी नोंदवली. पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून आयात शुल्क माफ करण्याची के लेली विनंतीही लगेचच मान्य झाली. अ‍ॅमेझॉन कंपनीकडे लॉजिस्टिक्ससाठी मदत मागितल्यावर त्यांनीही होकार दिला. हे साहित्य आणण्यासाठी मदत करण्याची एअर इंडियाला विनंती केली. त्यांनी चार चार्टर्ड विमाने देण्याची तयारी दाखवली. सिंगापूरहून आलेले साहित्य आता गरज असलेल्या जिल्ह्य़ांत पुरवले जाईल.

’ पीपीसीआरकडून प्रेरणा घेऊन अन्य शहरात असे समूह कार्यरत आहेत का?

काही समूह तयार झाले आहेत. नगरमध्ये एक समूह काम करतो आहे. त्याशिवाय देशभरातून माहितीसाठी सतत दूरध्वनी येत असतात. पुण्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याने आता राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही संवादातून काम करतो. संवाद आणि परस्पर आदरभाव असल्याशिवाय स्वत:तील गर्व मागे पडणार नाही. गर्व मागे पडल्याशिवाय असे काम करणे शक्य नाही. आम्ही काय काम करत आहोत हे आम्हाला कोणाला दाखवून द्यायचे नाही.

’ पीपीसीआरचे काम करोनानंतरही सुरू राहील का?

सध्यातरी आमचे उद्दिष्ट ‘करोना’च आहे. पुन्हा करोनाची लाट येऊ नये, याकडे आमचे लक्ष आहे. हा समूह पुढे राहील की नाही माहीत नाही. पण आम्ही एकमेकांचे मित्र झालो आहोत. त्यामुळे कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही त्यासाठी नक्कीच तयार आहोत, गरजेनुसार पुन्हा एकत्र नक्कीच येऊ.

मुलाखत : चिन्मय पाटणकर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) प्रणित पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने उद्योग, वैद्यकीय, संशोधन अशा विविध घटकांना सोबत घेऊन प्रशासनाला सहकार्य करत करोना काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या निमित्ताने एमसीसीआयएचे अध्यक्ष, पीपीसीआरचे प्रमुख समन्वयक सुधीर मेहता यांच्याशी साधलेला संवाद..