लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरू असूून, मृत्यूचे व रुग्णवाढीवर अद्याापही नियंत्रण आले नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत अकोल्यात सव्वापट अधिक मृत्यूदर आहे. अकोल्यात आतापर्यंत ४.५६ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. गत सलग आठ दिवसांत १२ जणांचे बळी गेल आहेत. दोन मृत्यू व १२ नवीन रुग्णांची नोंद शनिवारी झाली.

अकोला जिल्ह्यात करोना प्रचंड प्रमाणात पसरत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात सर्वच उपाययोजना अपयशी ठरल्या. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अकोल्यात आतापर्यंत एक आत्महत्या वगळता करोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला. ४.५६ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या तुलनेत अकोल्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून, राज्यात ३.६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात ६ ते १३ जूनपर्यंत सलग आठ दिवसांत करोनाबाधितांचा मृत्यू झाला. या कालावधीत १२ जण दगावले आहेत.

जिल्ह्यातील एकूण १०१ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ८९ अहवाल नकारात्मक, तर १२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९८५ झाली. सध्या रुग्णालयात ३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ४६ जणांचा करोनामुळे बळी गेला. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. दरम्यान, दोन महिला रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यातील एक ५२ वर्षीय महिला रुग्ण अकोट फैल येथील रहिवासी होती. १० जून रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. काल रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आणखी एक ८० वर्षीय महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावली आहे. त्या देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवासी होत्या. त्यांना ८ जून रोजी दाखल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

आज दिवसभरात १२ जणांचे अहवाल सकारात्मक आले. आज सकाळी पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात एक महिला असून चार पुरुष आहेत. ते रजपुतपूरा, बेलोदे लेआऊट, गायत्रीनगर, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळी प्राप्त अहवालात आणखी सात रुग्णांची भर पडली. त्यात दोन महिला असून पाच पुरुषांचा समावेश आहेत. ते हरिहरपेठ, अकोट फैल, मोठी उमरी, चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्याकीय महाविद्याालय सूत्रांनी दिली. करोनाबाधित आढळून आलेले परिसर तात्काळ प्रतिबंधित करून संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. मृत्यूचे प्रमाण व वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासन व नागरिकांची चिंता वाढवली आहे.

६३.४५ टक्के रुग्णांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यातील ६३.४५ टक्के रुग्णांची करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६२५ रुग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज सायंकाळी सोडण्यात आलेल्या १९ जणांचा समावेश आहे. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

६१७४ अहवाल नकारात्मक
आतापर्यंत जिल्ह्यातील ७१८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६८८१, फेरतपासणीचे ११६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७१५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ६१७४ आहे, तर सकारात्मक अहवाल ९८५ आहेत.