बाजारपेठा बंद झाल्यामुळे माल शेतात पडून

वसई :  मार्च ते जून हा फूल शेतीव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा हंगाम. परंतु पुन्हा एकदा करोनाचे संकट ओढवल्याने फुलबाजार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तयार झालेल्या फुलांचा शेतमाल हा आता शेतातच पडून राहिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अडचणी निर्माण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी मोठय़ा संकटात सापडले आहेत.

वसईच्या विविध ठिकाणच्या भागात फुलांची लागवड करणारे शेतकरी आहेत. चाफा,  मोगरा,सायली,जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. दादर येथील फुल बाजारात या फुलांना मोठी मागणी असते. मात्र सध्या सर्वत्र करोनाची दुसरी लाट फोफावली आहे. यामुळे दादर येथील फुल बाजार बंद ठेवण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच नेमका बाजार बंद झाल्याने फुलांवर मंदीचे सावट आले आहे. बाजार नाही त्यामुळे फुले विकणार तरी कुठे? जरी विक्रीसाठी बाहेर काढली तरी हवा तसा भावही फुलांना राहिलेला नसल्याचे फू ल शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

फुलांच्या भावात जवळपास ५० ते ६० टक्कय़ांनी घसरण झाली आहे. मोगरा सुरवातीला २०० रुपये किलोने जात होता तोच आता १०० रुपये किलो वर आला आहे. त्याचप्रमाणे चाफा, तगर , गुलाब, या सर्व फुलांचे भावही ५० टक्कय़ांनी खाली आहेत. आता तर बाजारच नाही यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फुलेही काढली नसल्याचे शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले आहे. मागील दोन वर्षांंपासून फूल शेतकरी मोठय़ा अडचणींचा सामना करीत आहेत. याही वर्षी मुख्य हंगामालाच अशी परिस्थिती ओढवली असल्याने फुलशेती व्यवसाय डबघाईला आला आहे.

शोभिवंत फुलांचा बाजारही गडगडला

वसईत इतर सुगंधी फुलांच्या सोबतच शोभिवंत फुलांची लागवड ही येथील शेतकरी करतात. यामध्ये ऑर्किड, आयरीस, हॉलीफोर्निया, जरबेरा, शोभेचा पाला यांचा समावेश आहे. परंतु आता करोनामुळे लग्नसमारंभ व इतर समारंभ साजरे करण्यावर निर्बंध घातल्याने या फुलांचा वापरच बंद झाला आहे. त्यामुळे अक्षरश: या फुलांचा बाजारच गडगडला आहे.

थोडय़ा वेळासाठी बाजारपेठा सुरू करा

जरी सर्व ठिकाणची मंदिरे, धार्मिक स्थळे बंद करण्यात आली तरी घरच्या घरी दैनंदिन पूजेसाठी या फुलांचा वापर करतात. त्यामुळे ग्राहक हे फुले खरेदीसाठी येत असतात. यासाठी दादर येथील फुल बाजारात थोडा वेळ तरी फूल व्यावसायिकांना बाजार सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी वसईतील फूल शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच जर फुल शेतकऱ्यांना परवानगी दिली तर फुलांचा माल थोडय़ा फार प्रमाणात का होईना परंतु विकला जाईल.