राशीन येथे करोनाचा रुग्ण सापडला यास स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी  आणि ग्रामसेवक हेच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप युवक नेते विक्रमसिंहराजे भोसले यांनी केला. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने त्यांनी आज तहसीलदार छगन वाघ यांना लेखी निवेदन देखील दिले. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य युवराज सिंह राजे भोसले ,अशोक जंजिरे, बापू उकिरडे यांच्या सह्य आहेत.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,की कर्जत तालुक्यातील पहिला पॉझिटिव्ह  रुग्ण राशीन येथे आढळून आला. यामध्ये  प्रशासनाचा  हलगर्जीपणा दिसून येत आहे. कारण पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांचे १४ दिवस विलगीकरण करणे गरजेचे आहे.

जगदंबा भक्त निवास ही ग्रामपंचायतीची मिळकत असून तिचा ताबा फक्त ट्रस्ट कडे आहे. तिचा उपयोग जनतेसाठी संकटकाळी करता येऊ शकतो व ते गावाच्या बाहेर आहे.

भक्त निवास मध्ये पाणी, स्वतंत्र महिला व पुरुष प्रसाधन गृह अशा सुविधा उपलब्ध असतानाही राशीन येथील  ग्राम पंचायत विभाग व वैद्यकीय विभाग यांनी राशीन येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जि.प. शाळे मध्ये लोकांचे विलगीकरण  केले आहे.

सदर ठिकाणी असणाऱ्या लोकांना या ठिकाणी कोणतीही सुविधा प्रशासनाने पुरविली नाही .  तेथे शौचालयाची कोणतीही सुविधा नाही.  लोक बिनधास्त बाहेर फिरतात. जेवणही त्यांचे नातेवाईक घेऊन येतात.  सदर  ठिकाणी असणारे लोक अंघोळ करणेसाठी घरी जातात व परत येऊन बसतात.

प्रशासनाने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात होणाऱ्या हानीपासून  राशीनला कोणीही वाचवू शकणार नाही, असेही शेवटी म्हटले आहे.