नव्या निर्बंधांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

वसई: वसई-विरार शहरातील करोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मागील दोन दिवसांत शहरामध्ये करोनाचे ६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात नव्याने निर्बंध लागू करता येतील का याबाबत पालिकेचा विचार सुरू आहे.

वसई-विरार शहरात मागील दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. डिसेंबर २०२० मध्ये शहरात करोनाचे १ हजार ८१ रुग्ण आढळले होते तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात करोना रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घसरली होती. जानेवारी २०२१ मध्ये करोनाचे केवळ ५८२ रुग्ण आढळले होते तर केवळ ९ जणांचा मृत्यू झाला होता. ही दिलासा देणारी बाब असल्याने पालिका प्रशासन निश्चिंत होते. त्यानंतर शहरातील करोना उपचार केंद्रेदेखील बंद करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मागील दोन दिवसांत तर करोनाचे ६० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

करोना रुग्णांची संख्या कशी आटोक्यात येईल याबाबत विचार सुरू आहे. वसई-विरारप्रमाणे मुंबई आणि राज्याच्या इतर भागांतदेखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यााबबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांच्याशी चर्चा केली.

शहरातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांकडून घेतली. त्याअंतर्गत शहरातील शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करणे, उपहारगृहांवर र्निबध घालणे, लग्न समारंभावर पूर्वीसारखे र्निबध आणणे, याबाबत विचार सुरू आहे. नागरिकांनी सामाजिक दूरीच्या नियमांचे पालन करणे, मुख्यपट्टय़ांचा वापर करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.