महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आजपर्यंत १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोठमोठ्या शहरांमध्ये मोबाइल क्लिनिक्सही उभे राहणार आहेत. तसंच प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल उभे करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात करोनाबाधितांचा मृत्यूदर ६ टक्के आहे. हा दर सरासरीपेक्षा जास्त आहे असंही ते म्हणाले. धारावीत रुग्णसंख्या वाढली आहे त्यामुळे धारावी सील करण्याचा विचार आहे का? असं विचारलं असता तूर्तास असा काही विचार करण्यात आलेला नाही मात्र धारावीत लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे असंही ते म्हणाले.