आठवडय़ात जिल्ह्यात  २८२ नवीन रुग्ण आढळले

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये करोना रुग्णांची संख्येने  एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.   या आजारामुळे एकंदर सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आठवडय़ातील जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८२ नवीन रुग्ण आढळले आहेत.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०४० करोना रुग्ण आढळले असून  यामध्ये गेल्या चार दिवसात रुग्णांची झपाटय़ाने वाढ झाली आहे. शुक्रवार २६ जून रोजी ८० रुग्णांची वाढ झाली असून शनिवारी २७ जून ९२, रविवार २८ जून ६७ तर आज सोमवारी २९ जून ४३ रुग्णांची वाढ झाली आहे.

पालघर तालुका, वसई ग्रामीण, जव्हार व वाडा तालुक्यातील रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. आठवडा अखेरीस या परिसरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या पैकी १५६ रुग्णांवर कोविड आरोग्य केंद्रावर तर ७६ रुग्णावर समर्पित कोविड रुगालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय बंद

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे नालासोपारा येथील एक कर्मचाऱ्याला करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने  जिल्हाधिकारी कार्यालय सोमवारी बंद होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. दूरचित्र संवादासाठी अधिकारी वर्गाने तालुक्यातील इतर ठिकाणांचा वापर केल्याची माहिती पुढे आली.

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ

झपाटय़ाने वाढ झालेल्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ  झाली आहे. असे असले तरी तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या रुग्णांची माहिती उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्ण आढळल्याच्या अफवांना पेव आला आहे. जिल्हा प्रशासनाकडे मनुष्यबळाच्या मर्यादा असताना नव्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या जोखीम संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणा कार्यरत राहात आहे. करोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना आखल्या जात असून काही ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तीने आपआपल्या क्षेत्रांमध्ये टाळेबंदी जाहीर केली आहे.