News Flash

…अन् करोनाबाधित वृद्ध महिलेला चक्क रूग्णालयाबाहेर रिक्षातच लावला ऑक्सिजन

रूग्णालयात जागाच उपलब्ध नाही; चार तास रूग्णवाहिका देखील मिळाली नसल्याचं नातेवाईकाचं म्हणणं

राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. शिवाय अनेक ठिकाणी लसीचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी करोनाबाधितांना आता मिळेल त्या ठिकाणी उपचार घेण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर वडूज (ता.खटाव) येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका करोनाबाधित महिलेला रूग्णालयात जागाच उपलब्ध न झाल्याने चक्क रूग्णालया बाहेरील रिक्षामध्येच ऑक्सीजन लावण्यात आले.

वडूज येथील ७५ वर्षीय एक महिला सकाळी ११ वाजेच्या सुमारास करोना तपासणी करून घेण्यासाठी रूग्णालयात आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला करोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची ऑक्सीजन पातळी तपासणी केली असता ती नेहमी पेक्षा कमी असल्याचे दिसून आले. ग्रामीण रूग्णालयातील कोविड केंद्र कर्मचारी, डॉक्टर उपलब्ध होऊ न शकल्याने बंद आहे. त्यामुळे येथील करोनाबाधितांना कोरेगाव व सातारा येथे दाखल केले जात आहे. आजपासून ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध न झाल्याने ते केंद्र सुरू होऊ शकले नाही. ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्या ठिकाणी इतर रूग्ण होते. त्यामुळे संबंधित करोनाबाधित महिलेला तेथे दाखल करता येत नव्हते. अखेर डॉक्टरांनी रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये या महिलेला ऑक्सिजन लावला. त्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱ्याला आणण्यात आले. सध्या त्या महिला रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोविड केंद्र, विलगीकरण कक्ष व करोना काळजी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 8:25 pm

Web Title: corona positive elderly woman was given oxygen in a rickshaw outside the hospital msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा – आरोग्य केंद्रांना बजाज संस्थेकडून वैद्यकीय उपकरणांची मदत
2 सामान्य गरजांची व्यवस्था करा नंतर लॉकडाउनचा विचार करा ठाकरेसाहेब… – भाजपा
3 लॉकडाउनची आज रात्री होणार घोषणा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार संवाद
Just Now!
X