मृताचा करोना चाचणी अहवाल प्रलंबित असतानाही रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर  अंत्यसंस्कारही पार पाडण्यात आले. मात्र, आता मृताला करोनाची लागण झाली होती, असा अहवाल आला आहे. त्यामुळे अंत्ययात्रेत उपस्थित असलेले नातेवाईक आणि इतर अशा ५०० लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

अर्नाळा येथील ५८ वर्षांच्या व्यक्तीला यकृतावरील  उपचारासाठी  वसईतील कार्डिनल ग्रेशियस (बंगली) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्यांचा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने त्यांचे  नमुने करोना चाचणीसाठी पाठवले होते. परंतु, अहवाल येण्याआधीच रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे दिला. सकाळी या मृतदेहावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सुमारे ५००हून अधिक लोक उपस्थित होते, अशी माहिती येथील एका ग्रामस्थाने दिली.

दरम्यान, अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या ६५ जणांना अलगीकरणत ठेवण्यात आले आहे.

‘कार्डिनल ग्रेशियस’ रुग्णालयाच्या महाव्यवस्थापक फ्लोरी डिमेन्डो यांनी सांगितले की, रुग्णामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. याशिवाय मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाकडे कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे नातेवाईकांच्या मागणीमुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याच वेळी वसई तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी रुग्णालयाला नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.