मातोश्री परिसरात करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मातोश्री परिसरात असलेल्या एका चहावाल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबईत आता ४९० रुग्ण झाले आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री ज्या भागात आहे त्याच परिसरात एकाला करोनाची लागण झाली आहे. ही बातमी समजताच हा भाग सील करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यांनी त्यावेळीही सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच गरज पडल्यास घराबाहेर पडू नका असंही म्हटलं होतं. आता मातोश्री परिसरातच करोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची आणि मातोश्री या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 7:36 pm