बीडमधील करोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला असून बुधवारी एका अत्याचार प्रकरणातील आरोपीलाही करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील आरोपी माजलगावच्या पोलीस कोठडीसह न्यायालयातही हजर होता. त्यामुळे पिडीत महिलेसह पोलिसांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

परळीतील रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील लॉकडाउन २० जुलै पर्यंत वाढवला आहे. तर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र त्या आरोपीचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने जदीद जवळा ( ता. माजलगाव ) येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू केली असून पीडित महिलेसह संपर्कात आलेल्या पोलिसांचीही करोना तपासणी करण्यात येणार आहे.

आरोग्य प्रशासनाकडून जलदगतीने चाचण्या – डॉ. राधाकिसन पवार

बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने जलदगतीने काही चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मिल्लीया महाविद्यालयातील कोविड – 19 केंद्रात नागरिकांच्या घशातील थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यापैकी काही चाचण्या रॅपिड अँटिजेन पद्धतीने करण्यात येणार आहेत. विशेषतः प्रतिबंधात्मक क्षेत्रातील संशयित व्यक्तींना तपासण्यासाठी आवाहन करण्यात आले असून प्रत्यक्ष चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी सांगितले.