जिल्ह्यात २६ लसीकरण केंद्रे प्रस्तावित

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम समाधानकारक असले तरी ग्रामीण भागात लसीकरणाच्या असुविधा असल्याने ग्रामीण भागांमध्ये नवीन लसीकरण केंद्रे स्थापन होणार आहेत. पालघर ग्रामीण भागातील २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नव्याने लसीकरण सुरू होणार असल्याने दुर्गम ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना लस घेणे सोयीचे होणार आहे.

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना सिरमची ‘कोव्हिशिल्ड’ लशी दिल्या गेल्या होत्या. मात्र, आता जिल्ह्यासाठी ‘भारत बायोटेक’च्या दहा हजारांहून अधिक ‘कोव्हॅक्सिन’ लशी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नव्याने लस घेणाऱ्या नागरिकांना त्या दिल्या जाणार आहेत. या लशी नवीन केंद्रांमधूनच दिल्या जातील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात व विक्रमगड येथे नव्याने लसीकरण केंद्र सुरू होत आहे व उर्वरित लसीकरण केंद्रे सुरू करण्यावर जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाशी चर्चा करून त्यानंतरच ती सुरू केली जाणार आहेत. दरदिवशी १०० लाभार्थ्यांना या लसीकरण केंद्रांवर लसी दिल्या जात आहेत. आतापर्यंत पालघर ग्रामीण क्षेत्रामध्ये १४ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. तर वसई-विरार महानगरपालिकेत १३ केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागांमध्ये चार खासगी तर वसई-विरारमध्ये आठ खासगी केंद्रे नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पालघरमध्ये दोन प्रकारच्या लशी

पालघर जिल्ह्यात ‘कोव्हिशिल्ड’अंतर्गत एकूण ५२ हजारच्या जवळपास लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ग्रामीण भागामध्ये वीस हजारपेक्षा जास्त नागरिकांना पहिला टप्प्यात तर पाच हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात लसीकरण झाले आहे. जिल्ह्यामध्ये नव्याने कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार असून याकरिता स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. विक्रमगड, वाणगाव व मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नवीन लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत केलेल्या पाहणी दरम्यान आढळलेल्या २० हजारहून अधिक सहव्याधी असलेल्या नागरिकांना ही लस देण्याचे प्रयोजन आहे. होळी सणाचा दरम्यान या लसीकरण कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

दुसरी लस यांना..

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत वीस हजार २१७ जणांना पहिली तर पाच हजार ४०६ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ६० वयोगटातील व्याधीयुक्त नागरिक व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.