News Flash

आता ५०० रुपयांत होणार करोना टेस्ट! खासगी प्रयोगशाळांमधील दर झाले कमी!

राज्यातील करोना चाचण्यांचे दर ५०० रुपयांपर्यंत खाली आणल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. राज्यात आता नव्या दरांनुसार करोना चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जाणार आहेत. याआधी ज्या चाचणीसाठी ७०० रुपये दर आकारले जात होते, ती चाचणी आता फक्त ५०० रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्व खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणीचे हे दर लागू असतील. यासोबतच रॅपिड अँटिजेन टेस्टच्या दरांमध्ये देखील कपात करण्यात आली असून आता ही चाचणी फक्त १५० रुपयांमध्ये करता येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत, असं देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

करोनाच्या चाचण्यांचे दर गेल्या काही महिन्यांमध्ये ४ हजार ५०० वरून ५ ते ६ टप्प्यांमध्ये कमी करत आता ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे आधी १२००, मग ९८० आणि शेवटी ७०० रुपये असे दर करण्यात आले होते. हे दर संकलन केंद्रावर नमुना देऊन चाचणी करण्याचे होते. आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५००,६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये संकलन केंद्रावरुन नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमुना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

रॅपिड अँटिजेन टेस्टचे दर देखील कमी झाले

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटिजेन, अँटिबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी प्रत्येक टप्प्यानुसार अनुक्रमे २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी अनुक्रमे प्रत्येक टप्प्यानुसार ३५०, ४५० आणि ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी प्रत्येक टप्प्यानुसार १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 9:59 pm

Web Title: corona rt pcr test rates decrease to 500 rs in maharashtra pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Maharashtra Corona Update : चिंताजनक! करोनामुळे दिवसभरात राज्यात २२७ मृत्यूंची नोंद, ३९,५४४ नवे करोनाबाधित!
2 “MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?”
3 सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ
Just Now!
X