महाराष्ट्रातील करोनाची स्थिती गंभीर आहे त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असं सांगत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नऊ पानी पत्र लिहिलं आहे. राज्यातील बहुतेक सर्व करोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर जी काही निरीक्षणं आढळली आहेत ती सगळ्या या नऊ पानी पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहेत. तसंच तातडीने करायच्या उपाय योजनांबाबतही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासूनच एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या उपाय योजना आणि निर्णयांना आम्ही प्रतिसाद दिला. अधिवेशनाची सांगता असो किंवा दोन महिन्यांनी झालेली सर्वपक्षीय बैठक आम्ही सहकार्य केलंच. मागील १२८ दिवसांमध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं. एप्रिल अखेरपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी आरोग्य सुविधा आहेत ती राज्यंही महाराष्ट्रापेक्षा चांगलं व्यवस्थापन करत आहेत असंही फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

ढासळलेली आरोग्य व्यवस्था, स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, गरीब घटकांना मदत न मिळणे, लॉकडाउन आणि अनलॉकबाबत सरकारी अवस्था सतत गोंधळल्यासारखी आङे. सरकारने केलेल्या घोषणा आणि जमिनीवरची स्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे.

पत्रातले मुख्य मुद्दे
१) रुग्णालयाबाहेर झालेले ६०० मृत्यू मुंबई महापालिकेने अद्याप जाहीर केलेले नाहीत

२) १० जुलैच्या प्रसिद्धी पत्रकात २७५ मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले असे दर्शवण्यात आले आहेत. आयसीएमआरने कोणते मृत्यू करोना मृत्यू समजावे आणि कोणते नाही याबाबत निर्देश दिले आहेत. असे असतान अन्य कारणांमुळे मृत्यू दाखवणे योग्य नाही

३) संपूर्ण राज्यातील रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढते आहे. त्याचा नीट अंदाज लावून आत्तात येणाऱ्या काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करणं आवश्यक आहे. ही सुविधा केली तरच करोना मृत्यू टाळणे आवश्यक आहे

४) राज्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणूनच रुग्णसंख्या अधिक आहे गृहितकच चुकीचे आहे. कारण प्रति दहा लाख लोकसंख्येमागे करण्यात महाराष्ट्राचा क्रमांक नववा आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा वाटा ३० टक्के आहे.

५) रुग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. विविध रुग्णालयांमध्ये चकरा मारणे आणि कुणीही दाखल करुन घेण्यास तयार नसणे, यातून रुग्ण दगाविण्याचे प्रमाण वाढते आहे. टेंभासारख्या ठिकाणी १४ तास, मुंबईत ३० तास रुग्णांना प्रवेश न मिळणं ही अवघड स्थिती आहे.

६) पुरेशा मनुष्यबळाचा अभाव जाणवतो. त्यामुळे गेल्या १२८ दिवसांपासून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.

७ ) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या शहरांमधील आणि जिल्ह्यात सध्या उपलब्ध रुग्णवाहिका वाढत्या रुग्णसंख्येनुसार पुरेशा नाहीत. या रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या गेल्या पाहिजेत

८) अॅक्टमेरा, रेमडेसिवीर ही औषधे बाजारात उपलब्ध होत नाहीत. त्याचा सर्रास काळा बाजार केला जातो आहे. ही औषधं उपलब्ध करुन देण्यासाठी उपाय योजणे आवश्यक

९) राज्यात उभारण्यात आलेल्या विलीगकरण कक्षांमध्ये बऱ्याच ठिकाणी वेळेत पाणी, जेवण मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात सुरु आहेत. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने क्वारंटाइन सेंटर्समध्ये जाणे नागरिक टाळत आहेत. ज्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव टाळणे अशक्य होऊ शकते

१०) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३० ते ४५ या वयोगटातील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. याबाबत उपाय योजले जाणे आवश्यक आहे

हे प्रमुख मुद्दे मांडत नऊ पानांचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.