आयसीएमआरच्या सूचनांकडे दुर्लक्ष

नागपूर : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करणाऱ्यांना करोना चाचणी अहवाल  आवश्यक राहणार नसल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने स्पष्ट के ले असताना पश्चिम बंगाल सरकारने महाराष्ट्रसह इतर राज्यातून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल  असल्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश काढले आहेत.

पूर्व रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक सौमित्र मजुमदार यांच्या कार्यालयाने रेल्वेच्या सर्व प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना त्यासंदर्भात पत्र लिहून सूचित के ले आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अहवाल नकारात्मक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा चाचणी अहवाल प्रवासाला निघण्याच्या ७२ तासांपूर्वीचा असणे आवश्यक आहे. दरम्यान,भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या ४ मे २०२१ च्या अधिसूचनेनुसार राज्यांतर्गत (दोन राज्यात) प्रवास करण्यास आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही. निरोगी व्यक्तीला विनाकारण चाचणी बंधनकारक करून करोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेवर ताण निर्माण होऊ नये, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने रेल्वे आणि एसटीच्या प्रवाशांकडे करोना चाचणी अहवाल नकारात्मक असणे अनिवार्य के ले आहे. याशिवाय मुंबई, पुणे आणि नागपूरहून पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या गाडय़ांमधील प्रवाशांकडील चाचणी अहवाल तपासण्याची सूचना देण्यात आली आहे.