News Flash

ब्रिटनहून आलेल्या १२७ प्रवाशांची करोना चाचणी नकारात्मक

महाराष्ट्राच्या इतर भागांसह पालघर जिल्ह्यातही हे प्रवासी ब्रिटनहून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबपर्यंत प्रवास करून आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

निखिल मेस्त्री

पालघर जिल्ह्यात ब्रिटनहून आत्तापर्यंत १२७ प्रवासी प्रवास करून आल्याची यादी राज्य शासन व विमान प्राधिकरणाकडून जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. यात वसई-विरार महापालिका हद्दीतील ११८ तर इतर पालघर, तलासरी, वसई ग्रामीण भागातील आहेत.  यातील बहुतांश प्रवाशांच्या चाचण्या केल्या गेल्या असून त्याचे अहवाल नकारात्मक  आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. तरी खबरदारी म्हणून पुढील चौदा दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

ब्रिटन, उत्तर आफ्रिका व तेथील मध्यपूर्व देशांमध्ये आलेल्या नवीन स्वरूपाच्या  व ७० टक्के अधिक तीव्रता असणाऱ्या करोना विषाणूने थैमान घातल्यानंतर  पालघर जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागांसह पालघर जिल्ह्यातही हे प्रवासी ब्रिटनहून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबपर्यंत प्रवास करून आले आहेत. यादी प्राप्त झालेल्या प्रवाशांमध्ये  लक्षणे आढळून आलेली नसली तरी खबरदारी घेतली जात आहे.

पुढे या प्रवाशांपैकी कोणालाही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यासाठी करोना उपचार केंद्रांमध्ये विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात गुरुवापर्यंत ५७ प्रवाशांची यादी जिल्ह्याला मिळाली असून शुक्रवारी ६९ प्रवासी यादी प्राप्त झाली आहे. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ब्रिटन व तत्सम देशातून पालघर जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती आरोग्य विभागाला द्यावी किंवा नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही

हे प्रवासी पालघर जिल्ह्यात आले असले तरी काहींचे अहवाल नकारात्मक आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशा प्रवाशांसोबत दुजाभाव करू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मुखपट्टय़ा नियमित लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात स्वच्छ करणे, कमी संपर्कात राहणे अशा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:02 am

Web Title: corona test of 127 passengers from uk negative abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जिल्ह्य़ातील इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याच्या मार्गावर
2 नाताळचा घरगुती उत्साह पण सार्वजनिक शुकशुकाट
3 अ‍ॅमेझॉनच्या वसईतल्या ऑफिसमध्ये मनसैनिकांची तोडफोड
Just Now!
X