करोना चाचणीच्या दरांमध्ये राज्यशासनाने पुन्हा एकदा कपात केली आहे. आता करोना चाचणीचा दर हा ९८० ऐवजी ७८० रुपये इतका असणार आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात करोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरीही नव्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे मात्र अजूनही नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील रुग्ण वाढीचा दर हा ०.२१ इतका आहे. आपल्या राज्याची करोना रुग्णांची संख्या जास्त असते मात्र आता रुग्ण वाढीचा दर कमी झाला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.  WHO ने आपल्या धारावी पॅटर्नची दखल घेतली ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. मालेगावमध्येही करोनाचा कहर माजला होता मात्र आपण त्यावरही नियंत्रण मिळवलं असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महाराष्ट्राचा राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. आपलं राज्य मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झालेलं राज्य आहे. त्यामुळे राज्यात करोनाचं प्रमाण आधी वाढलं. मात्र आता हे प्रमाण कमी होऊ लागलं आहे. मुंबईत करोनाच्या काळात धारावी पॅटर्न राबवण्यात आला त्याचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनं केलं. करोनावर उपचार करण्यासाठी आपण टास्कफोर्स नेमला. औषधं कोणती द्यायची याबाबत चर्चा केली. डेथ ऑडिट कमिटीही आपण जिल्हास्तरावर आणि राज्य स्तरावर केली असंही राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.

सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आपण करोनाच्या काळात काम केलं आणि आताही करतो आहोत. महानगर पालिकांचे दवाखाने, जिल्हा रुग्णालयं आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेची रुग्णालयं यात जे लोक दाखल झाले होते त्यापैकी ८२ टक्के रुग्णांना आपण मोफत उपचार दिले आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.