कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोव्हिड-१९’च्या चाचण्या करण्यास मान्यता मिळाली असून, ‘कोव्हिड-१९’ चाचणीसाठीची सातारा जिल्ह्यातील ही पहिली प्रयोगशाळा ठरली आहे. आता, त्यामुळे कराडमध्येच ‘कोव्हिड-१९’च्या चाचण्या होतील आणि रुग्णांचे चाचणी अहवाल जलदगतीने मिळणे शक्य होईल.

कृष्णा हॉस्पिटलची रोगनिदान प्रयोगशाळा एनएबीएल मानांकित असून, याठिकाणी ‘कोव्हिड-१९’ च्या चाचण्या करण्यास आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ सेवावर्ग असल्याने या प्रयोगशाळेला ‘कोव्हिड-१९’ची चाचणी करण्याची परवानगी देत असल्याचे पत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने आपल्या मान्यतापत्रात म्हटले आहे.

कृष्णा हॉस्पिटल करोना साथरोगाच्या सामन्यासाठी अगदी सुरूवातीपासून अग्रेसर राहिले आहे. संशयित आणि बाधित अशा रुग्णांसाठी स्वतंत्र प्रभागांची निर्मिती राहताना, तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका व अन्य सेवकवर्गाकडून करोना बाधित रुग्णांची घेतली जाणारी विशेष काळजी यामुळे येथे रुग्णांमध्ये रोगमुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या ४ रुग्णांना सुखरूप स्वगृही पाठवण्यात आले असून, यामध्ये १० महिन्याच्या बालकाचा आणि ७८ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात ‘कोव्हिड-१९’ची चाचणी करण्याची सोय उपलब्ध नसल्याने संशयित रूग्णांचे स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जायचे. या प्रयोगशाळेवर मोठा ताण असल्याने किमान दोन दिवसानंतर चाचणी अहवाल उपलब्ध होत होते. त्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील रोगनिदान प्रयोगशाळेस ‘कोव्हिड-१९’ची चाचणी करण्यास मान्यता मिळावी, यासाठी कृष्णा विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आग्रही होते. ‘कोव्हिड-१९’च्या चाचण्या येथेच होऊ  लागल्यास लवकर निदान होऊन तातडीने योग्य उपचार सुरू करणे शक्य होईल, तसेच निष्कर्ष अहवालासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेवर विसंबून राहावे लागणार नाही, ही त्यामागची भूमिका होती. त्या अनुषंगाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडे पाठपुरावा सुरू होता.