15 July 2020

News Flash

सातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या

‘आयसीएमआर’, ‘एम्स’ची मान्यता

संग्रहित छायाचित्र

 

येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात ‘कोविड १९’च्या चाचण्या करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली असून सध्या या द्वारे आजाराची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी केली जाणार आहे. या चाचण्यांसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स) यांनी मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

ट्रनॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या यंत्रणेद्वारे औषध प्रतिबंधक क्षयरोगाच्या चाचण्या करण्यात येतात. आता या यंत्राद्वारे कोविडच्या चाचण्या करण्यासही मान्यता मिळाली आहे. या यंत्रणेद्वारे दिवसाला ३५ ते ४० चाचण्या करता येतील. या आजाराची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्यांसाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे. यामुळे या रुग्णांचे अहवाल लवकर मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच अन्य प्रयोगशाळांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होणार आहे.

ही यंत्रणा उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन खाली जिल्हा क्षयरोग केंद्रातील डॉ. श्रीमती ए. व्ही. जाधव, कर्मचारी, नोडल ऑफिसर व जिल्हा रुग्णालयातील डॉ. सारिका बडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी परिश्रम घेतले.

आठ नवे रुग्ण

कराड : सातारा जिल्ह्यमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८ जण नव्याने करोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये चिंचणी (ता. खटाव) येथील ५, पळशी (ता. खंडाळा) येथील १ तसेच कृष्णा हॉस्पीटल येथे दाखल दोघे असे ८ जणांचे करोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामुळे जिल्ह्यतील करोनाबाधितांची संख्या ४६०  वर पोहोचली आहे. आजवर त्यातील १४३ रुग्ण उपचार घेऊन करोनामुक्त झालेत तर, २९३ करोनाबाधित उपचार घेत आहेत. करोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने उपचारादरम्यान मृत पावलेल्या करोनाबाधितांची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, मोठय़ा प्रमाणात प्रलंबित असलेले चाचणी अहवाल तसेच जिल्ह्यबाहेरून आलेले आणि विलगीकरणात असलेले हजारो लोकांमुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 12:32 am

Web Title: corona tests now at satara district hospital abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात तीन दिवसांतच दोनशे रुग्ण वाढले
2 गाव करोना भीतीच्या छायेत अन् ग्रामपंचायत कार्यालयात दारू पार्टी..!
3 बारामतीत करोना चाचणी सुरू
Just Now!
X