News Flash

Corona Third Wave : आरोग्यमंत्री टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले…

ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

संग्रहीत

राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं आहे.

राजेश टोपे म्हणाले, “करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्राने वर्तवलेली आहेच. ती जुलै शेवट, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याची पूर्व तयारी राज्य शासनाच्यावतीनं केली जात आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की, आपण बेड वाढवण्याकडे लक्ष द्या, केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. त्याला लागणारं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधी, ऑक्सिजन या सगळ्यासंदर्भात स्वतः आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजेत. यासाठी आपण पीएसए दर्जाचे ऑक्सिजन प्लॅन्ट लावले पाहिजे. ऑक्सिजन जनरेटर आपण मोठ्या पद्धतीने विकत घेतले पाहिजेत. आपण जे काही ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट काढलं होतं, त्या संदर्भातील देखील जे काही प्रस्ताव विविध देशातून आलेले आहेत, त्याबाबत अंतिम निर्णय त्वरीत घेतला पाहिजे. असे आदेश आरोग्यमंत्री म्हणून मी आताच झालेल्या माझ्या व्हीसीमध्ये दिलेले आहेत.”

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

तसेच, “लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी जे ऑक्सिजन टँक्स आहेत, ते जे काही ऑफर झालेल्या आहेत त्याच्या पीओ लवकर दिल्या गेल्या पाहिजेत. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरच्याबाबत आमचं जे काही टास्क फोर्स आहे, त्यांनी लवकर त्यांना अप्रुव्हल दिलं पाहिजे.” असं देखील यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.

राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे.या रूग्णांवर उपचारासाठी मेडीकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. अशी माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली आहे.

याचबरोबर आज  (6 मे ) साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. दिनांक 4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. तसेच, गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाव्दारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स व्दारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत. अशी देखील माहिती टोपेंनी दिली असून, रेमडेसिवीरबाबतची राज्यातील आजची स्थिती दर्शवणाऱ्या आकडेवारीचा तक्ता देखील ट्विट केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आदेश  – 
राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प  तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही. तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यावी ,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी राज्यातील विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात करोना तिसरी लाट येईल; तज्ज्ञांचा इशारा

महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी बुधावारी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

तिसऱ्या लाटेचे नियोजन गरजेचे

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून  या लाटेची तीव्रता कमी करण्यासह आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच पहिली आणि दुसरी लाट हाताळताना आढळेल्या त्रुटी, उणीवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून अनेक देशांमध्ये दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट आली आहे. त्यामुळे राज्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 1:44 pm

Web Title: corona third wave health minister rajesh tope made a big statement said msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ऐन करोनाच्या संकटकाळात आरोग्य विभागात मेगाभरती! १६ हजार पदांसाठी निवडप्रक्रिया होणार!
2 नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणः आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर
3 गुन्हा रद्द करण्याच्या अनिल देशमुखांच्या मागणीला उच्च न्यायालयाची स्थगिती; कठोर कारवाईपासून सुटका नाहीच!
Just Now!
X