मुंबईहून आलेल्या दोघांना करोनाची बाधा झाली असल्याचे करोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी दिली. यापैकी एक रुग्ण जत तालुक्यातील तर एकजण सांगलीतील आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तातडीने घेण्यात आला असून जतमधील रुग्णासोबत असलेल्या तिघांना आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हयात करोनाचा संसर्ग पसरणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन घेत असतानाच मुंबईहून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांकडून करोनाची बाधा होत असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मुंबईतील चेंबूर येथून चौघे जण मालट्रकमधून दोन दिवसापुर्वी नागज येथे आले. तेथून ते चालत अंकले येथे गेले. या सर्वाना तत्काळ आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी नेले असता एकामध्ये करोना सदृश लक्षणे आढळल्याने मिरजेतील करोना रूग्णालयात दाखल करून स्वॅबची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याने करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगलीतील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये ६ मे रोजी मुंबईहून बेकायदा आलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचाही अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून त्यालाही करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हयातील करोना बाधितांची संख्या ३७ झाली आहे. यापैकी इस्लामपूरचे २६ जणांनी करोनावर मात केली असून शिराळा तालुक्यातील निगडी येथील तरुणी आणि तिची आई यांचीही दुसरी करोना  चाचणी नकारात्मक आल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २८ वर पोचली आहे.