राज्यात करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. त्यातच आज राज्य सरकाने २५ जिल्ह्यांमध्ये करोनाचे निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आज दिवसभराती राज्यातील करोनाची आकडेवारी दिलासादायक अशीच ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११ हजार १२४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६० लाख ७५ हजार ८८८ झाला आहे. यासोबतच राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.५९ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

दिवभरात ७ हजार २४२ नवे करोनाबाधित

एकीकडे करोनावर मात करून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असताना नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील सातत्याने कमी राहिला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार २४२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ६२ लाख ९० हजार १५६ इतका झाला आहे. त्यापैकी ७८ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याचा मृत्यूदर घटला, २.१ टक्के नोंद

राज्याचा मृत्यूदर गेल्या काही दिवसांमध्ये २.४ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात १९० करोना मृत्यूची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात १ लाख ३२ हजार ३३५ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध होणार शिथिल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले. उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.