करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र तणावाचं वातावरण आहे. लोकांनी गर्दी करणं टाळावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीतही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आपलं सामाजिक भान राखलं आहे. शहरातील बेघर आणि भिक्षेकऱ्यांना फुड पॅकेट आणि पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत दिवसातून दोन वेळा समितीमार्फत वाटप केलं जाईल असं व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना आपापली दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकऱ्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न उभा राहिला होता…या लोकांसाठी अखेरीस मंदिर समितीने फुट पॅकेज आणि पाणी वाटण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी समितीतल्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास ३५० फुड पॅकेट आणि पाणी शहरातील बेघरांमध्ये वाटलं.

याआधीही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कठीण प्रसंगांमध्ये आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडलं आहे. राज्यातील दुष्काळ, काही महिन्यांपूर्वी पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती यासाठी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली होती. सध्या करोनामुळे राज्यावर मोठं संकट आलेलं आहे, अशा परिस्थितीतही मंदिर समितीने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे.