पालघर: पालघर पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांच्या वारसांना पोलीस शिपाई पदावर अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली असून पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी मंगळवारी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

पालघर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात १७ पोलीस अंमलदार कर्तव्यावर असताना मृत्यू पावले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व मुलांना त्यांच्या जागेवर नोकरी मिळावी यासाठी जिल्हा पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करत वीस दिवसात हे प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवले होते. या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांनी मान्यता दिली असून मृत्युमुखी पावलेल्या पोलीस अंमलदार यांच्या वारसांना पोलीस दलात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. यावेळी त्यांचा गौरवही केला गेला. पालघर जिल्हा पोलीस दलात प्रथमच अनुकंपा तत्त्वावर ही भरती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचाऱ्यांनी याकामी प्रयत्न केले आहेत.