News Flash

राज्यात शेतीवर संकट

परिणामी, शेतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या; महागाईची भीती मोसमी पावसाने अंदाजाच्या एक दिवस आधीच राज्यात दमदार हजेरी लावली. आगमन धडाक्यात साजरे केल्यानंतर दोन आठवडे राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाला. परंतु गेला आठवडाभर त्याने पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी, शेतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रमुख पिकांसह अन्य शेतमालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास महागाईची भीती आहे.

 

करोना विषाणू साथनियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत आला. आगमनाच्या सत्रात तो जोरदार बरसल्याने शेतकरी सुखावला होता. त्याचबरोबर यंदा चांगले पीकपाणी येण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. परंतु दोन आठवड्यांनंतर पावसाचा जोर ओसरला. आता आठवड्याभरापासून तो गायब  असल्यामुळे पेरण्या अपूर्ण राहिल्या आहेत. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग आतुरतेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता तर पाऊस आणखी आठवडाभर पडण्याची शक्यता  धूसर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये यंदा मृगाच्या मुहुर्तावर पेरण्या आटोपतील असा अंदाज होता, मात्र अखेरच्या चरणात पावसाने दडी मारली आहे. तालीच्या आणि कसदार रानात उगवलेल्या पेरण्यांमध्ये आता कोळपणीची कामेही चालू झाली आहेत. मात्र हलक्या रानातील पिके माना टाकू लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे साळुंकी, मोर, उंदीर फस्त करू लागले आहेत.

विदर्भात सरासरी ३० ते ४० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. नागपूर विभागाच्या कृषी सहसंचालकांनी मात्र सरासरी ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तूर, मूग, कापूस पिकांची पेरणी सुरू आहे, तर धानासाठी रोपवाटिका तयार केल्या जात आहेत.

मराठवाड्यात काही मोजक्या मंडळात पडलेल्या पावसामुळे आठ जिल्ह्यांत आता पेरणी करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. या वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असली तरी पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी काळजीत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत पाच लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तेलबियांची ६.१९ टक्के, तृणधान्य ७.८९, कडधान्य ८.३६ टक्के  पेरणी झाली आहे. धुळे जिल्ह््यात वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्माही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात केवळ १३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात हंगाम रखडला

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यांत खरिपामध्ये ज्वारी, बाजरी, मका, गळीत धान्यांची पेरणी मुख्यत्वे केली जाते. घाटमाथ्यालगतच्या तालुक्यांमध्ये भातासह नाचणीही खरिपात घेतली जाते. यंदा मृगाच्या मुहुर्तावर पेरण्या आटोपतील असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत असतानाच अखेरच्या चरणात पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे. तालीच्या आणि कसदार रानात जगल्या-उगवलेल्या पेरण्यांमध्ये आता कोळपणीची कामेही चालू झाली आहेत. मात्र हलक्या रानातील पिके आता माना टाकू लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे साळुंकी, मोर, उंदीर फस्त करू लागल्याने शेतक ऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

सातारा जिल्ह्याच्या खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव या पट्ट्यात अद्याप पावसाअभावी शेते मोकळी आहेत. वाई, महाबळेश्वर, सातारा, जावळी, पाटण, कराड या घाट माथ्यालगतच्या भागात सुरुवातीला जोरदार हजेरी लावणारा पाऊस नंतर गायब झाला आहे. सांगली जिल्ह्यातही आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने ५२ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दमदार सुरुवात केल्याने यंदा मृगाच्या मुहुर्तावर पेरण्या आटोपतील असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत असतानाच अखेरच्या चरणात पावसाने दडी मारली. आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती मात्र काहीशी समाधानकारक आहे. जिल्ह्यातील ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी आठवडाभर पाऊस कोसळत असल्याने भाताचे पीक कुजण्याची भीती होती. मात्र वेळीच उघडीप मिळाल्याने उगवण चांगली झाली आहे. खरीप लागवडीसाठी प्रसिद्धीस आलेला सोलापुरातही यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात खरीप क्षेत्र पावणेचार लाख हेक्टरपर्यंत आहे. यंदा जेमतेम २३.६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उजनी धरणाच्या पाण्यावरील भाग वगळता अन्यत्र खरिपाची स्थिती रखडलेली आहे.

 

मराठवाड्यात सारे लक्ष आभाळाकडे 

औरंगाबाद : परभणी, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांत सुरू झालेल्या पेरण्या थांबल्या आहेत. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी बियाणे अद्याप बाहेर काढलेच नाही. पावसाने दडी मारल्याने आता सारे लक्ष आभाळाकडे लागले आहे. काही मोजक्या मंडळात पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत आता पेरणी करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. या वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असली तरी पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे. मराठवाड्यात ४७ लाख ८७ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असे अपेक्षित असून आतापर्यंत पाच लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस झाला होता. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण भरले आहे. बीड, जालना जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २४ टक्के पेरणी झाली. औरंगाबाद जिल्ह््यात मका पिकाऐवजी सोयाबीन पिकास प्राधान्य द्यावे असे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत. पण सारे प्रयत्न पावसावर अवलंबून आहेत.

विदर्भात निम्म्यापेक्षाही कमी

नागपूर : सध्या पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे नागपूर जिल्ह््यासह काही जिल्ह््यांत पेरण्या करपल्या आहेत. अमरावती विभागात आतापर्यंत २२ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. विभागाचे सरासरी क्षेत्र ३२ लाख ३९ हजार हेक्टर आहे. सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यांत ६० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. वाशीम ५४ टक्के, अमरावती २२ टक्के, अकोला १० टक्के, तर बुलढाणा जिल्ह््यात केवळ ४ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ५७ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली होती. नागपूर विभागात १९.२६ लागवड क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या. २१ जूनपर्यंत ही टक्केवारी १९ टक्के (३.४६ लाख हेक्टर) होती. अलीकडच्या काळात पाऊस झाल्याने त्यात वाढ झाली. नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक आर.जे. भोसले यांनी मात्र सरासरी ५० टक्के पेरण्या आटोपल्याचा दावा केला. तूर, मूग, कापूस पिकांची पेरणी सुरू आहे तर धानासाठी रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. २१ जूनपर्यंत  पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती व यवतमाळ तर पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह््यात सरासरी १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात अल्प प्रमाण

नाशिक जिल्ह््यात तेलबियांची ६.१९ टक्के, तृणधान्य ७.८९, कडधान्य ८.३६ टक्के  पेरणी झाली आहे. जळगाव जिल्ह््यातील काही भागांत पावसाची स्थिती बऱ्यापैकी असल्याने ६० ते ७० टक्के  पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात कपाशीचा सुमारे साडेचार लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. गिरणा नदीकाठच्या भागात महिन्याभरापूर्वीच बागायती कपाशीची लागवड करण्यात आली. त्याखालोखाल मका, सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. कृषी विभागाने ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन के ले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी केली होती. मात्र, पाऊस वेळेवर न पडल्याने जिल्ह््यात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते.

जळगावच्या उलट स्थिती धुळे जिल्ह््यात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्माही पाऊस झालेला नाही. जिल्ह््यात यंदा चार लाख १६ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज असताना आतापर्यंत केवळ १३ टक्के क्षेत्रावर म्हणजे साधारणपणे ४६ हजार ३३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात कपाशीची सर्वाधिक लागवड झाली आहे. आतापर्यंत २० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ४४ हजार ५५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. नंदुरबार जिल्ह््यातही पेरण्या थंडावल्या आहेत. जिल्ह््याच्या सरासरी पेरणीयोग्य क्षेत्राच्या अवघ्या ५.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

कोकणात भातलावणीला प्रारंभ

रत्नागिरी : राज्याच्या अन्य काही भागांमध्ये पावसाने ताण दिला असला तरी कोकणात तो नियमितपणे पडत असल्याने या आठवड्यात लावणीची कामे सुरू झाली आहेत. गेल्या महिन्याच्या मध्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतरच्या आठवड्यातही पावसाच्या सरी अधूनमधून पडत राहिल्याने शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केल्या. मृग नक्षत्राच्या एक दिवस आधीच, ६ जूनपासून मोसमी पाऊस पडू लागला. भाताच्या रोपांची वाढ होण्यासाठी हा पाऊस पोषक ठरला. आता अनेक भागांत भातलावणीची कामे सुरूही झाली आहेत.

पाऊस आठवडाभर क्षीण?

’पुणे : राज्यात सध्या मोसमी पाऊस क्षीण झाला असून, पुढील आठवडाभर बहुतांश भागात तो दडी मारण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.

’काही भागांतील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर ओसरल्याने चिंता व्यक्त होत आहे. मध्य महाराष्ट्रात आठवडाभर पावसाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे.

’राज्यात  पुढील आठवडाभर मोठ्या पावसाची शक्यता धूसर आहे. देशाच्या मध्यवर्ती भागातही हीच परिस्थिती आहे.

मराठवाड्यात…

मराठवाड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बिगरमोसमी पावसाने पल्लवीत केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता कोमेजून गेल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही. मराठवाड्यात पेरणी झालेल्या १७ टक्के क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे सारे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.

विदर्भात… पाऊस गायब झाल्याने पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सरासरी ३० ते ४० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. कमी-अधिक प्रमाणात पावसाची चांगली व्याप्ती असल्याने पूर्व विभागातील धान पट्टा वगळता इतरत्र शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती. पण, नंतर पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे नागपूर जिल्ह्यासह काही जिल्ह्यांत पेरण्या करपल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात…  सातारा,

सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातही पावसाअभावी खरिपातील पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. या चारही जिल्ह्यांत विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने आठवडाभर पूर्णपणे उघडीप दिली आहे. दुष्काळी पट्ट्याकडे तर पावसाने पाठ फिरवली असल्याने खरिपाचा हंगाम ठप्प आहे.

उत्तर महाराष्ट्रात… जळगाव जिल्ह््याचा अपवाद वगळता  पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. नाशिक जिल्ह््यात खरिपाच्या ६,६५,५८२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ६०,३४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी अहवालानुसार जिल्ह्यात तृणधान्ये, तेलबिया, कडधान्याची ९.०७ टक्के पेरणी झाली आहे. लवकर पाऊस न झाल्यास ही पेरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 2:29 am

Web Title: corona virus farmer rain state monsoon rains many parts of the state akp 94
Next Stories
1 फडणवीस यांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे : भुजबळ
2 पुण्यात चक्का जाम आंदोलनात करोना नियमांचा भंग; भाजपा नेत्यांसह १०० ते १५० जणांवर गुन्हा
3 Maharashtra Corona Update : राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद, १५६ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X