08 March 2021

News Flash

करोना नियंत्रणासाठी प्रशासन पुन्हा सक्रिय

अधिकारी वर्ग सुट्टीवरून परतल्याने ही कारवाई व्यापक स्वरूपात करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी रस्त्यावर

पालघर : करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे.  त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने करोनाकाळात लागू केलेल्या नियमांची काटेकोर अंलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन  सक्रिय झाले आहे. जिल्हाधिकारी स्वत: कारवाई करण्याच्या प्रक्रियेत स्वत: रस्त्यावर उतरल्याने इतर अधिकारीदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास पुढे सरसावले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये तसेच समूहात  मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रथम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना दंड ठोठावून त्याची प्रचीती दाखवून दिली  आहे.

लग्न सोहळ्याच्या प्रसंगी आवश्यक परवानगी न घेणे, सार्वजनिक कार्यक्रमात ५० व्यक्तींचा निर्बंधाचे पालन न करणे अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका प्रकारात सातपाटी व उमरोळी येथील लग्न सोहळ्यात तसेच शिरगावजवळील एका रिसॉर्टमध्ये छापा टाकून कारवाई केली. वर व वधूच्या नातेवाईकांसह तसेच रिसॉर्ट मालकांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने अधिकतर अधिकारी  रजेवर असल्याने करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई मर्यादित स्वरूपात सुरू होती. आता अधिकारी वर्ग सुट्टीवरून परतल्याने ही कारवाई व्यापक स्वरूपात करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विवाह सोहळे,  उपाहारगृह तसेच सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे होणारे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डहाणूत दोन दिवसांत  २२ हजारांची दंडवसुली

डहाणू :  डहाणूत मुखपट्टीविना फिरणाऱ्या ८८ नागरिकांविरुद्ध कारवाई करत २२  हजार ६०० रुपयांची दंडवसुली केली आहे. महसूल विभाग, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे संयुक्तपणे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

डहाणू नगरपालिका क्षेत्रात लग्न समारंभ तसेच पारनाका, मसोली नाका, सागर नाका ते स्थानक रस्ता परिसरातील  दुकाने, बँक आदी ठिकाणी मुखपट्टीविना  फिरणारे पादचारी, वाहनधारक यांच्यावर शनिवार, रविवारी अशा दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली.  या वेळी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यासह नगर परिषद, महसूल तसेच पोलीस अधिकारी मोहिमेत सहभागी होते.

पथके तयार

गेल्या दोन दिवसांत विविध शासकीय विभागांची पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी दोनशे रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांहून अधिक दंडात्मक रकमेची वसुली करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:32 am

Web Title: corona virus infection administration reactivated for corona control akp 94
Next Stories
1 सॅनिटरी पॅड विल्हेवाट यंत्र वापराविना
2 पालघरमध्ये सरकारी केंद्रातील कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू
3 विक्रमगडमध्ये सूर्यफुलाच्या लागवडीत दुप्पट वाढ
Just Now!
X