News Flash

जिवंत व्यक्तीलाच करोनाने मृत झाल्याचा निरोप !

जबाबदार यंत्रणेने आपल्याला देण्यात आलेल्या यादीनुसार हा निरोप दिल्याचे सांगत हात झटकले.

(संग्रहित छायाचित्र)

साताऱ्यात सरकारी यंत्रणेच्या चुकीने मनस्ताप

वाई : करोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या तरुणाच्या घरी तो मृत झाल्याचा निरोप देत शासकीय यंत्रणेने आपल्या गलथान कारभाराचा पुन्हा एक अनुभव जनतेस दिला. या प्रकारामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. तर यास जबाबदार यंत्रणेने आपल्याला देण्यात आलेल्या यादीनुसार हा निरोप दिल्याचे सांगत हात झटकले.

फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय २०) याला गेल्या महिन्यात करोना संसर्ग झाला होता. यावर त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत तो बरा झाला. या गोष्टीला आता महिना होत तो सामान्य आयुष्यही जगू लागला होता. मात्र या पार्श्वभूमीवर सोमवारी (७ जून) सिद्धांत घरी असताना त्याच्याच भ्रमणध्वनीवर हा सरकारी निरोप आला. पलीकडील महिला कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकूण सिद्धांतला काही सुचेना. त्याने ‘हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आईकडे भ्रमणध्वनी दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हा काय अभद्र निरोप देत आहात, असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे आम्ही केवळ निरोप देण्याचे काम करत आहोत, असे सांगत हात वर केले. करोना हाताळणीतील गलथानपणावरून अगोदरच टीकेची  धनी झालेल्या या सरकारी यंत्रणेकडून आता जिवंत व्यक्तींना ते करोनाने मृत झाल्याचे निरोप जाऊ लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला असून या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्धांतच्या आईने ‘लोकसत्ता’ शी बोलताना केली.

दरम्यान मृत व्यक्तीचे नाव असणारी यादी आम्हाला साताऱ्यातून आली. यादीत संबंधितांचे नाव आणि माहिती असल्यामुळे आमच्याकडून त्यांना दूरध्वनी गेला. यामध्ये नेमके काय झाले याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येईल, असे फलटणच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शीतल सोनवलकर यांनी  स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:09 am

Web Title: corona virus infection corona death patient akp 94 2
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुराचा वेध ‘कर्ण’च्या मदतीने
2 पावसाचा अनियमितपणा म्हणजे ऋतूंमध्ये बदल नव्हे
3 नगरच्या महापौर निवडणुकीत समीकरणे बदलणार?
Just Now!
X