उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगाला साकडे
पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे. भक्तिरसात, टाळ-मृदुंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे. यासाठी देवा आता करोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ औसेकर आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, की आषाढी म्हटले की वारक ऱ्यानी फूलून गेलेले, विठ्ठलनामात आणि टाळ-मृदुंगांत दंग झालेली पंढरी डोळ्यांपुढे उभी राहते. करोनामुळे गेले दोन वर्षे हे सारे थांबले होते. यासाठीच पांडुरंगाला साकडे घातले आहे. हे संकट नष्ट होऊ दे, सामाजिक अंतर मिटू दे. वारकऱ्यानी तुडुंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पुन्हा दिसू दे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

दरम्यान यंदा मंदिरातील ज्येष्ठ विणेकरी केशव शिवदास कोलते (जि. वर्धा) आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई केशव कोलते यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने  एक वर्षाचा मोफत पास सुपूर्द करण्यात आला. याच कार्यक्रमात पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यात्रा अनुदानाचा पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ औसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.