News Flash

पालघरमध्ये १०० खाटांची वाढ

महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ८९५ नवे रुग्ण आढळले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

तालुक्यातील खासगी रुग्णालयांत खाटांची सुविधा

पालघर : पालघर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी  तालुक्यात १०० खासगी खाटांची वाढ करण्यात आली आहे. तालुक्यातील दोन  खासगी रुग्णालय आणि एका सेवाभावी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ८९५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामीण भागातील ३५१ तर पालघर तालुक्यातील २१४ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ३३१८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी २१६३ रुग्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आहेत. त्याबरोबरीने पालघर तालुक्यात ७०२, डहाणू दीडशे, जव्हार  १४३, वसईच्या ग्रामीण भागात ५१ तर तलासरी व वाडा येथे प्रत्येकी ४० रुग्णांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बोईसर येथील टिमा रुग्णालयात तीस तर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात व डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी २०रुग्णांवर उपचाराची सुविधा  आहे.   शासकीय रुग्णालयांमध्ये मर्यादित प्राणवायू खाटा उपलब्ध असल्याने शहरी भागातील रुग्णांना विक्रमगड येथील रिवेरा रुग्णालयात किंवा वसई विरार, ठाणे, मुंबई व गुजरात येथील खासगी रुग्णालयात दाखल होणे भाग पडत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी बोईसर भागाचा दौरा करून त्या भागात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी रिकामी असलेल्या इमारतींच्या पाहणी केली. तसेच उद्योजकांची बैठक घेऊन सद्य:स्थितीची अवगत केली. अनेक उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून शासनाला मदत करण्याची तसेच करोना रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर उभारण्याकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. पालघर येथे डॉ. एम. एल. ढवळे रुग्णालयात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ४० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. त्याचप्रमाणे बोईसर येथील चिन्मय विद्यालयात ४० व तुंगा रुग्णालयात २० खाटांचे खासगी करोना रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येईल. तालुक्यात १०० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अशाच प्रकारची खासगी वैद्यकीय उपचार सेवा डहाणू येथील वेदांत रुग्णालयात सुरू करण्याबाबत विचाराधीन असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एक हजार २३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून ग्रामीण भागातील मृतांची संख्या ३१६ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनुक्रमे ५२१ व ३७४ इतकी वाढ झाली आहे.

‘रुग्णांच्या मानसिक स्थितीचा विचार व्हावा’

करोना आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचारासोबत त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये याकडे आरोग्य व्यवस्थेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी ढवळे रुग्णालयात उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले. रुग्णांची शुश्रूषा योग्य पद्धतीने व्हावी तसेच त्यांच्यासाठी करमणुकीचे साहित्य व दूरचित्रवाणी संच उपलब्ध असावेत असे त्यांनी सूचित केले. अनेक रुग्ण गृह विलगीकरण पद्धतीने उपचार घेत असताना त्यांना टेलीमेडिसिन धरतीवर उपचार घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी डॉ.ढवळे रुग्णालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधींना सूचित केले.

विशेष पथक

पालघर तालुक्यात करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या विचारात घेऊन तालुक्यात सक्षम अधिकारी यांच्या पथकाची निर्मिती जिल्हाधिकारी यांनी केली आहे. पालघरचे उपविभागीय अधिकारी पथक प्रमुख असून या पथकामध्ये पालघर व बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:03 am

Web Title: corona virus infection corona patient bed facility in a private hospital akp 94
Next Stories
1 दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई
2 फळमाशीला रोखण्यासाठी ‘सापळा’
3 प्लास्टिकड्रमच्या आडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला वेसण
Just Now!
X