दैनंदिन चाचण्यांपैकी ५५ टक्के अहवाल सकारात्मक

वसई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच पातळ्यांवर नवे उच्चांक निर्माण होत आहेत. वसई-विरार शहरात दैनंदिन करोना रुग्णांची मोठी वाढ होत असून धक्कादायक बाब म्हणजे दैनंदिन करोना चाचण्या केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक जणांचा करोना अहवाल सकारात्मक येत आहे. ११ एप्रिल ते २१ एप्रिल या दहा दिवसांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता करोनाबाधितांचा सरासरी दर हा ५५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पहिल्या लाटेपेक्षा यात मोठी वाढ दिसत असल्याने चिंता वाढली आहे.

वसई-विरार शहरात मागील वर्षी मार्च महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. वर्षभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मागील वर्षी दिवसाला सरासरी शंभर ते दीडशे रुग्ण आढळून येत होते. आता मात्र रुग्णांचे प्रमाण कमालीचे वाढले असून दिवसाला सरासरी ८०० ते ९०० रुग्ण आढळून येत आहेत. करोनाच्या चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्ण सकारात्मक येण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

संसर्गाची लागण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत रुग्ण गंभीर बनतो. त्यामुळे पहिल्या स्तरावर चाचणीचे निदान आल्यानंतर लवकर उपचार मिळू शकतात. यामुळे करोना चाचण्यांवर भर दिला आहे. महापलिकेच्या दोन रुग्णालयांसह २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोनाच्या चाचण्या केल्या जातात. या ठिकाणी आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्या करण्यात येतात. दिवसाला सरासरी एक हजाराच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण हे ५५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संतोष देहेरकर यांनी दिली. सकारात्मक आलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतील तर गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. इतर गंभीर रुग्णांवर पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अनेक आस्थापना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दर पंधरा दिवसांनी करोना चाचण्या करण्याचे बंधनकारक केले आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांत आणि राज्यात जाण्यासाठीसुद्धा करोना चाचणी करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे करोना चाचणीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील खासगी प्रयोगशाळेत करोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांना दोन दोन दिवस थांबावे लागत आहे.

पालिकेने आतापर्यंत (२१ एप्रिलपर्यंत) २ लाख ४७ हजार ९५९ नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या. त्यापैकी ४६ हजार ५६७ रुग्ण हे करोनाबाधित आढळून आले आहेत. यातील ९८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ हजार १२९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.