|| संजय वाघमारे 

पारनेर : करोना संसर्गाच्या निदानासाठी बेकायदेशीररीत्या करण्यात येत असलेल्या जलद  प्रतिजैविक चाचण्यांमुळे (रॅपिड अँटिजेन टेस्ट) तालुक्यातील काही खासगी रुग्णालये, दवाखाने संसर्गाचे ‘सुपर स्प्रेडर’ठरत आहेत. त्यामुळे आरोग्य, महसूल प्रशासनाकडे नोंद नसलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे रुग्ण सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणे वावरत आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर नजीकच्या काळात तालुक्यात करोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी बेकायदेशीररीत्या रॅपिड अँटिजेन तपासण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मान्य करतानाच या तपासण्या थांबवण्यात अथवा अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात असमर्थता दर्शवली.

थंडी,ताप, खोकला अशा करोनासदृश लक्षणांच्या उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात गेल्यानंतर अश्या रुग्णांना रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचे सुचवण्यात येते.रुग्णाने तयारी दर्शवल्यावर दवाखान्यात उपलब्ध असलेल्या अमान्यताप्राप्त चाचणी संचाद्वारे अथवा बेकायदेशीररीत्या चाचणी करणाऱ्या व्यक्तीमार्फत चाचणी करण्यात येते.या चाचणीत करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेल्या रुग्णाला जास्त मात्रेची प्रतिजैवके, उत्तेजके (हायर अँटीबायोटीक्स, स्टिरॉईडस) असलेली औषधे दिली जातात.

खासगी रुग्णालयात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेल्या चाचणीत सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य अथवा महसूल प्रशासनाला कळवण्यात येत नाही. त्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेला अथवा अजिबात लक्षणे नसलेले रुग्ण बिनदिक्कत गर्दीच्या ठिकाणी,भाजी, फळे बाजारात, बाजारपेठेत वावरतात.संबंधित रुग्ण घरीही फारशी काळजी घेत नाहीत.त्यामुळे अशा रुग्णांपासून करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दक्षिण कोरियातील एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट किट’ चा वापर करण्यास मान्यता दिली आहे.या व्यतिरिक्त कुठल्याही कंपनीचे किट वापरण्याची परवानगी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेली नाही. तसेच जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रांसह कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त इतर कोणालाही रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याची परवानगी दिलेली नाही.

रुग्णांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत केंद्रावर चाचणी करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या जलद प्रतिजैविक चाचण्या (रॅपिड अँटीजेन टेस्ट) होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला आहे.मात्र परिस्थिती सध्या बिकट आहे.गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.बेकायदेशीर चाचण्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही.खुल्या बाजारात मिळणाऱ्या,मान्यता नसलेल्या संचाद्वारे करण्यात येणाऱ्या चाचण्या अजिबात विश्वासार्ह नाहीत. संशयित रुग्णांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत केंद्रात चाचण्या केल्या तर बेकायदेशीर चाचण्यांना आळा बसेल.

  • डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, नगर.