News Flash

ना वैष्णवांची मांदियाळी, ना टाळ-मृदंगांचा गजर…

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चैत्री, आषाढी, कार्तिंकी, माघी अशा एकूण चार वाऱ्या महत्त्वाच्या.

|| मंदार लोहोकरे
पंढरपूर : करोना महामारीमुळे पंढरीत सलग दुसऱ्या वर्षीचा आषाढी सोहळा हा निर्बंधात पार पडला. एरवी लाखो वैष्णवांची मांदियाळी, टाळ-मृदंगांचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष यात दंग होणाऱ्या या पांडुरंगाच्या भूमीत यंदाही केवळ शुकशुकाट होता. मोजके वारकरी आणि शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्या वर्षीचा आषाढी सोहळा पार पडला.

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चैत्री, आषाढी, कार्तिंकी, माघी अशा एकूण चार वाऱ्या महत्त्वाच्या. यातही आषाढीचे स्थान सर्वोच्च. दरवर्षी या आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्य आणि परराज्यातून दहा लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल होतात. अनेक संतांच्या पालख्या सोबतच्या हजारो वारक ऱ्यासह पायी वारीने या सोहळ्यासाठी येतात. आषाढीच्या दिवशी ही सारी विठ्ठलनगरीच या वैष्णवांच्या मांदियाळीत हरवून जाते. मात्र गेल्या वर्षीपासून करोना महामारीमुळे या सोहळ्यावरही निर्बंध आले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना निवडक वारक ऱ्यासोबत प्रवेश, अन्य भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी, शहर आणि परिसरात लावलेली संचारबंदी या साऱ्यामुळे यंदाची आषाढी देखील भाविकांविना ठरली.

निर्मनुष्य मंदिर परिसर, चंद्रभागा तीरावरील शुकशुकाट, निवडक वारक ऱ्याचा हरिनामाचा जयघोष आषाढीपेक्षाही करोनाची जाणीव देत होता. एरवी कित्येक किलोमीटर दूर गेलेली दर्शन रांग यंदा कुठेच नव्हती. केवळ निवडक भाविकांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. पुढे संचारबंदीतच प्रमुख मानाच्या पालख्यांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. चंद्रभागा स्नानास तर मनाई केलेली होती. आषाढी असूनही त्याचा तो सोहळा कुठेही न दिसता सर्वत्र केवळ त्या करोनाचे सावटच जाणवत होते. आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरही ही खंत दिसत होती. हे संकट दूर होत पांडुरंगा पुढील वारी तरी ‘आषाढी’ची होऊ दे, अशी विनवणी ते करीत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:09 am

Web Title: corona virus infection corona test pandharpur wari ashadi ekadashi akp 94
Next Stories
1 महावितरणमधील उपविधि अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद!
2 मेळघाटातील बालमृत्यू घटले तरी कुपोषणाचे आव्हान
3 कोकण, घाटमाध्यावर पुढील तीन दिवस पावसाचे
Just Now!
X