|| मोहनीराज लहाडे

नगर : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या संवर्गनिहाय अनेक संघटना आहेत. या संघटनाही प्रबळ आहेत. आपापसात त्यांचे नेहमीच ‘अरे ला का रे’ सुरू असते. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक ही संस्था तर त्यांच्यातील रणधुमाळीचे केंद्र असते. त्यामुळे या बँकेच्या सभा नेहमीच गाजतात. यातून प्राथमिक शिक्षक आणि त्यांच्या संघटनांचे एक वेगळे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. त्याला छेद देण्याचे काम करोना परिस्थितीत प्राथमिक शिक्षकांनी करून दाखवले आहे.

नेहमी परस्परविरोधी भूमिका मांडणाऱ्या संघटना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत समन्वय समितीच्या माध्यमातून करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करून, अनेक तालुक्यांतून उपचार सुविधा निर्माण केल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांची समाजाशी असलेली नाळ तुटत चालली काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शिक्षकांनी एकत्रित कृतीतून दिलेले हे उत्तर आहे.

गेल्या वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या करोना प्रादुर्भावाच्या काळात शाळा बंद असल्याने प्राथमिक शिक्षक करतात काय, त्यांना काय काम आहे, असा प्रश्न उपस्थित केला केला जातो. विशेषत: करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी एकत्र येत आपल्या गावात, तालुक्यात उपचार सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. करोनाकाळात संघटना पदाधिकारी वगळले तर बहुतांशी प्राथमिक शिक्षक ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी जोडला गेला होता. ‘झूम अ‍ॅप’च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करणे, स्वाध्याय पुस्तिका, ‘टिलीमिली’ शनिवारची गोष्ट असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जात होते. काही शिक्षक तर दुर्गम भागात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिले. याशिवाय धाडसाने घरोघर जाऊन करोनाबाधितांची माहिती जमा करण्याच्या सर्वेक्षणातही जुंपलेले होतेच. गावोगावच्या सरकारी प्राथमिक शाळा सध्या विलगीकरण कक्ष बनलेल्या आहेत. यासह ‘करोना केअर सेंटर’मध्येही प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

समाज संकटात असताना आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना आपल्यामध्ये अद्याप जिवंत आहे हे शिक्षकांनी दाखवून दिले. जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत तरी प्राथमिक शिक्षक संघ (सदिच्छा आणि गुरुमाऊली मंडळ), प्राथमिक शिक्षण समिती (गुरुकुल मंडळ), अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (ऐक्य मंडळ), बहुजन शिक्षण संघ (इब्टा) अशा पाच-सहा प्रमुख संघटना व त्यांची मंडळे आहेत. संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर मंडळे बँकेचे राजकारण आणि निवडणुकीसाठी झगडत असतात. या संघटनांची समन्वय समितीही आहे. इतर वेळी निद्रिस्त अवस्थेत असलेली ही समन्वय समिती करोनाच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकीतून जागृत झाली आणि त्यांनी करोनाग्रस्तांवरील उपचार सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षकांना यासाठी शिक्षक नेत्यांची, जिल्हा नेतृत्वाची गरज भासली नाही. काही तालुक्यात तर वेगवेगळ्या संघटनांचे सभासद असलेले शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी मदत कार्यासाठी निधी संकलित केला. समाजमाध्यमी गटांचा यासाठी चांगला उपयोग करून घेण्यात आला.

तालुक्यातील प्रशासनाशी समन्वय साधत ठेवत ‘करोना केअर सेंटर’उभारणे, तेथे प्राणवायू सुविधा निर्माण करणे, कोविड सेंटरपर्यंत बाधितांना पोहोचवणे, औषधोपचार साहित्य, विलगीकरणातील बाधितांना जेवण पोहोचवणे यासारख्या अनेक सेवाकार्यात शिक्षकांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे.

सर्वाधिक निधी जमा झाला आहे तो अकोलेसारख्या आदिवासी आणि दुर्गम तालुक्यातून. तेथे प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापकांकडूनही सहकार्य मिळाले. अकोल्यात ३२ लाख, संगमनेरमध्ये १५ लाख, राहुरी ७ लाख, शेवगावमध्ये ५.५०, पाथर्डीत ५, नेवासे ६ लाख २५ हजार, जामखेडमध्ये २ लाख पारनेरमध्ये ६ लाख ६० हजार, श्रीरामपूर मध्ये ३ लाख ५० हजार, राहत्यात ४ लाख २५ हजार, नगर तालुक्यात २ लाख, कर्जत ३ लाख, श्रीगोंद्यात ४ लाख, कोपरगाव १ लाख २५ हजार, उर्दू माध्यमातील शिक्षकांनी सुमारे ४ लाख रुपयांचा निधी संकलित करून तेथील लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासनाकडे रोख अथवा साहित्य स्वरूपात सुपूर्द केला. याशिवाय शिक्षक बँकेनेही ७ लाखांचा निधी दिला आहे.

काळाची गरज ओळखून एकत्र येऊन रचनात्मक काम उभे करता येते, शिक्षकांची अद्याप समाजाशी असलेली नाळ तुटलेली नाही, हेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शिक्षकांकडे गावाचे नेतृत्व करण्याचे पुण्यसंचित होते. आपत्तीमध्ये यंत्रणा कोसळत असताना सरकारी शाळांतील शिक्षक दातृत्वाच्या नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून पुढे आले आहेत. अकोल्यातील सुगाव हे या सकारात्मक कृतीचे ‘मॉडेल’ ठरावे. – भाऊसाहेब चासकर,  उपक्रमशील शिक्षक, अकोल

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संघटना व त्यांची मंडळे यांनी मतभेद विसरून समाजाचे देणे लागतो हे ओळखून निधी गोळा केला. करोना केअर सेंटर आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मदत केली. यातूनच आता पुढे प्राथमिक शिक्षकांचे मोठे रुग्णालय का असू नये, अशी कल्पना पुढे आली आहे. शिक्षक बँक व विकास मंडळ या माध्यमातून शिक्षकांचे रुग्णालयसुद्धा उभे राहू शकते आणि त्याचा दुर्बल घटकांनाही उपयोग होऊ शकतो.  -डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते, गुरुकुल मंडळ

शिक्षक समाजाच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी असतो. करोना संकटात समाजाला मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने एक कोटीपेक्षा जास्त रकमेची मदत केली आहे. मुख्यमंत्री निधीलाही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. शिक्षक बँकेनेही मुख्यमंत्री निधीला सात लाखाची मदत दिली आहे.  – बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ