श्रीरामपुर : राहुरी तालुक्यातील जातीय एकात्मता जपणारे व सर्वधर्मीयांना सोबत घेऊन गावाचा विकास साधणाऱ्या बारागाव नांदूर गावात दरवर्षी धूलिवंदनाचे औचित्य साधत जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जावयांची धिंड स्थगित केली जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धिंड काढत जावई बापूला मानसन्मान देण्याची परंपरा रद्द होणार आहे.

बारागाव नांदूरमध्ये माजी आमदार स्व. काशिनाथ पवार, तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव गाडे, स्व. मच्छिंद्र गाडे यांनी विकासासह गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदावेत यासाठी सामाजिक कार्यक्रमांना महत्त्व दिले गेले. नागपंचमी सणाच्या दिवशी गावातील ज्येष्ठ व तरुण एकत्र येत कबड्डी खेळ खेळणे, संत कानिफनाथ महाराज यात्रोत्सव, लालेसाहेब बालेसाहेब दग्र्याचा यात्रोत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरा करणे यासह एकात्मतेला महत्त्व दिले. त्यानंतर स्व. शिवाजीराजे गाडे, स्व. बापुसाहेब गाडे यांनीही विकासाला महत्त्व देत गाव एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

सद्य:स्थितीत गावातील तरुण गुण्यागोविंदाची प्रथा पार पाडत आहेत. दरम्यान, गावातील धूलिवंदनाच्या दिवशी जावईबापूची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा करोना पाश् र्वभूमीमुळे गेल्या वर्षी स्थगित ठेवली. करोनाचे सावट दुसऱ्या वर्षीही कायम असल्याने यंदाही गावात जावईबापूची मिरवणूक होणार नसल्याची स्थिती आहे. प्रशासनाने गर्दी करण्यास मनाई केली असल्याने प्रथेला थांबा मिळणार आहे. त्यामुळे करोनाने सगळ्यांना हैराण केले असले तरीही गावातील जावईबापूंना दिलासाही दिला आहे.

दरवर्षी ग्रामस्थ अत्यंत छुप्या पद्धतीने जावईबापूचा शोध घेतात. कोणत्याही जाती धर्माचा असो तो फक्त गावातील जावई असला पाहिजे. गावामध्येही अनेक जावईबापू राहत असल्याने साधारण ३० ते ४० जण होळी व धूलिवंदन सणाच्या आदल्या दिवशीच गावातून पोबारा करतात. जावईबापू भूमिगत होत असल्याने ग्रामस्थांना जावयांचा शोध घेण्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागते. ग्रामस्थांच्या हाती जावई येताच एकच जल्लोष केला जातो. धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावर जावयाला बसवून संपूर्ण गावात मिरविले जाते. या वेळी टायर, जुन्या वापराचे पोते, वंगण, दूषित पाणी अंगावर टाकून धिंड संपूर्ण गावातून निघते. दोन ते तीन तास गावातून मिरवणूक निघते. या वेळी गावातील समस्त ग्रामस्थ व महिला घराबाहेर येऊन जावयांच्या धिंडीची मजा घेतात.