News Flash

गावठी कोंबड्यांना ‘भाव’

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती-बागायतीमध्ये चरणाऱ्या व वाड्यामध्ये अधिवास करणाऱ्या कोंबड्या पाळण्याचे बंद केले आहे.

|| नीरज राऊत

करोना आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; दर वधारले

पालघर :  करोना आजाराच्या काळात शरीरातील उष्णता व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गावठी कोंबड्या उपयुक्त असल्याचा समज अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गावठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी  आहे. परिणामी या कोंबड्यांच्या दरांमध्ये दुप्पट-तिपटीने वाढ झाली आहे. अनेकदा संकरित वाणांची किंवा देशी जातीच्या कोंबड्यांची विक्री गावठी कोंबड्या म्हणून केली जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे.

पूर्वी  १५०  ते २०० रुपये प्रति किलो दराने मिळणारी गावठी कोंबडी सध्या साडे ४०० ते ५०० रुपये किलो इतक्या दराने विकली जात आहे. विशेष म्हणजे अशा कोंबड्याची उपलब्धता कमी झाल्याने बाजारामध्ये गावठी कोंबड्या दिसल्या की खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडताना दिसते. पालघर जिल्ह्यातील बेटेगाव व मांडवी या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात अशा कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक येताना दिसतात.

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती-बागायतीमध्ये चरणाऱ्या व वाड्यामध्ये अधिवास करणाऱ्या कोंबड्या पाळण्याचे बंद केले आहे. अगदी ग्रामीण-डोंगराळ भागात देखील ठरावीक ठिकाणी गावठी कोंबड्या उपलब्ध होताना दिसतात. गावठी कोंबड्यांच्या ऐवजी रंगीबेरंगी पीस असलेली ‘गावरान’, ‘आर आर’ तसेच ‘नगर-डी’ अशा देशी जातीच्या संकरित कोंबड्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचीच विक्री गावठी कोंबड्या म्हणून राजरोसपणे करण्यात येते. पूर्वीचे घरगुती पक्षी पालन व्यवसाय बंद झाल्याने अशा संकरित कोंबड्या वाढवून मर्यादित स्वरूपात त्या विक्रीसाठी आणून गावठी कोंबड्या किंवा देशी वाहनाच्या कोंबडी म्हणून सांगून विक्री केल्या जात आहेत.

३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे कोंबडीचे पिल्लू (पिलोटे)चे सूप आरोग्यदायी असल्याचे मानले जात असल्याने त्यांनादेखील मोठी मागणी आहे. मात्र कोंबडीची जात ओळखण्याची पद्धत माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होताना दिसते.

विशेषत: करोनाकाळामध्ये गावठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आल्याने दोनशे-अडीशे रुपये प्रति किलोची  कोंबडी दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक किमतीत सर्रास विकली जाते आहे.

विक्रेत्यांकडून शिष्टाईची अपेक्षा

सद्यस्थितीत विक्रीसाठी आणण्यात येणारे अधिकतर पक्षी संकरित (ब्रॉयलर) प्रजातीचे असून या प्रजातीला देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा परिस्थितीत गावठी कोंबड्यासारख्या दिसणाऱ्या इतर संकरित प्रजातींची विक्री करताना त्या प्रजाती बद्दलची माहिती ग्राहकाला देण्याची शिष्टाई विक्रे त्यांनी करायला हवी अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गावठी कोंबड्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य बनवण्याचा प्रयत्न

पूर्वीच्या ‘रोढ आयलंड रेड’ (आरआयआर) प्रजातीच्या कोंबड्या कोसबाड येथील कृषी विकास केंद्रातून वितरित करण्यात आल्यानंतर त्या प्रजातीला कोसबाडी कोंबडी म्हणून या भागात संबोधले जाऊ  लागले. सद्यस्थितीत या कोंबड्या उपलब्ध होत नाहीत. पालघर जिल्ह्यातील पक्षीपालन क्षेत्र पिछाडीवर पडला असून देशी व स्थानिक कोंबडीचा वाण विकसित करून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. एखाद्या प्रजातीला ‘ब्रीड’ म्हणून ओळख प्राप्त होण्यासाठी ठरावीक क्षेत्रफळात त्यांची अपेक्षित संख्या असणे आवश्यक असून कोसबाडी कोंबडीला पालघर जिल्ह्याची ओळख प्राप्त करून देण्यासाठी पशु संवर्धन विभागाकडून पत्रव्यवहार सुरू आहे.

संकरित कोंबडी कशी ओळखावी?

संकरित असलेल्या कोंबडीचे पाय पिवळे धमक असतात, शेतात पाळण्यात आलेल्या कोंबड्यांच्या पायावर खवल व काळसरपणा असतो, नख अधिक तीक्ष्ण व धारदार असतात.

गावठी कोंबड्यांची चोच तुलनात्मक लांब असते तर संकरित कोंबडीची चोच कापलेली असते. गावठी कोंबड्या काटक असतात तर संकरित कोंब्यांमध्ये मास अधिक प्रमाणात असते. देशी वाणांच्या कोंबड्यांमधील हाड मजबूत असल्याने खाण्यास अवघड असते तर संकरित कोंबड्या खाताना हाड सहजपणे तुटते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 12:13 am

Web Title: corona virus infection immunity power rate for village hens cock akp 94
Next Stories
1 ‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीसाठी समिती
2 पालघर नागरी वस्तीवर डासांचा हल्ला
3 पाठिंब्यासाठी उद्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन
Just Now!
X