जालना : जिल्ह्य़ात ५ ते १९ एप्रिलदरम्यानच्या पंधरवडय़ात ११ हजार ९२४ करोनाबाधित आढळून आले आहेत. या काळात झालेल्या एकूण ४६ हजार ९४९ चाचण्यांमधील करोनाबाधितांचे हे जवळपास २५ टक्के आहे.

या पंधरवडय़ात सक्रिय रुग्णांमध्येही वाढ होत असून ५ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजार २०४ होती तर १९ एप्रिल रोजी ही संख्या सात हजार ५२७ झाली. या १५ दिवसांत करोनामुळे ८५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्य़ातील गृह अलगीकरणातील करोनाबाधितांची संख्या दोन हजार १४७ वरून पाच हजार ६७१ झाली आहे. तर संस्थात्मक अलगीकरणातील करोनाबाधितांची संख्या २१७ वरून ६९५ झाली.

१९ एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ात अडीच लाखांपेक्षा अधिक करोना चाचण्या झाल्या. त्यामध्ये एक लाख ४६ हजार आरटीपीसीआर तर उर्वरित प्रतिजन चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांमधील करोनाबाधितांचे प्रमाण २२.६९ टक्के तर प्रतिजन चाचण्यांमधील प्रमाण जवळपास साडेसहा टक्के आहे. ३० हजारांपेक्षा अधिक (७९ टक्के) रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ात करोनामुळे ६२० रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी ४७० मृत्यू शासकीय रुग्णालयात तर १५० मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. एकूण करोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण १.६२ टक्के आहे.

करोना उपचार आणि संबंधित बाबींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. करोना रुग्णांसाठी जिल्ह्य़ातील खाटांची स्थिती त्याचप्रमाणे प्राणवायू, रेमडेसिवीर इत्यादींच्या उपलब्धतेच्या संदर्भात जिल्ह्य़ातील तपशील या नियंत्रण कक्षात संकलित होणार आहे.