25 February 2021

News Flash

रुग्णवाढीची चिंता

डहाणू येथे रुग्ण संख्या वाढत असल्याने त्याठिकाणी देखील कोविड केअर केंद्र पुन्हा कार्यरत करणे आवश्यक झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यात करोना केंद्रांची कमतरता आणि पर्यायी केंद्र सुरू करण्याचे आव्हान

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता सुरू झाली आहे. करोना केंद्राची कमतरता, टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर जुन्या केंद्राच्या ठिकाणी सुरू झालेले प्रशासकीय कामकाज त्यामुळे पर्यायी केंद्राची व्यवस्था आदी आव्हाने जिल्हा प्रशासनासमोर उभी आहेत.    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या करोनाचे ८२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी  पालघर तालुक्यात ५७  तर डहाणू तालुक्यात २२ रुग्ण आहेत. या बरोबरीने तलासरी, विक्रमगड व वाडा येथे प्रत्येकी एक करोना रुग्ण आढळून आला आहे.

सद्यङ्मस्थितीत जव्हार येथील मुलींच्या वसतिगृहात ५० व आयटीआय महाविद्यालयात १५०, विक्रमगड तालुक्यातील रिवेरा रुग्णालयात १५०, वाडा तालुक्यातील आयडियल रुग्णालयामध्ये १८०, पालघर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुलांचे वसतिगृह, पोलीस  कस्टडीतील  ५०  अशा कोविड केअर केंद्रात एकंदर बाधित रुग्णांसाठी ५८० खाटांची क्षमता आहे. पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये नगर परिषदेने ८० विलगीकरण खाटांची व्यवस्था यापूर्वी केली होती.

असे असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्ण नसणाऱ्या वसई ग्रामीण, तलासरी व मोखाडा या भागांमध्ये पूर्वी कार्यरत असणाऱ्या कोविड केअर केंद्रांना सावधगिरीची उपाययोजना म्हणून पुन्हा क्रियाशील बनवणे आवश्यक झाले आहे. त्याच पद्धतीने डहाणू येथे रुग्ण संख्या वाढत असल्याने त्याठिकाणी देखील कोविड केअर केंद्र पुन्हा कार्यरत करणे आवश्यक झाले आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या लक्षण दिसणाऱ्या १६६ रुग्णांवर करोना संदर्भातील उपचार करण्याची व्यवस्था डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) मध्ये व्यवस्था असून त्यापैकी वाडा येथील आयडियल रुग्णालयात शंभर, डहाणू धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात ३०, डहाणू येथील ट्रॉमा केअर केंद्रामध्ये २०, पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात सोळा रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. याखेरीज वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असणाऱ्या १५ करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

करोनाचा संसर्ग झालेल्या ज्येष्ठ नागरिक, इतर आजार झालेले बाधित किंवा गंभीर करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी समर्पित करोना रुग्णालय असून रिव्हरा रुग्णालयात अडीचशे, वेदांत रुग्णालयात साठ, पालघरच्या ढवळे रुग्णालयामध्ये ५० तर बोईसर येथील टिमा रुग्णालयात ३० रुग्णांवर उपचार   क्षमता सध्या कार्यरत आहे.

निधीची आवश्यकता

ज्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कमी होती, त्या ठिकाणी उपचार केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यकता भासत आहे. मोखाडा व तलासरी येथील जुन्या केंद्रांच्या ठिकाणी इतर कार्यालयीन काम सुरू झाल्याने अशा ठिकाणी नवीन जागा अधिग्रहित करणे व त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड केअर केंद्र कार्यरत राहण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असून त्याकरिता आर्थिक तरतूद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  जिल्ह्यात सध्या साडेचारशे करोना रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता  आहे.  जिल्ह्यातील डहाणू, वसई (ग्रामीण), तलासरी व मोखाडा या चार तालुक्यांमध्ये करोना उपचार केंद्र तसेच करोना विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:28 am

Web Title: corona virus infection incirse patient patient growth anxiety akp 94
Next Stories
1 पालघर जिल्ह्यातील १४ हजार शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत
2 ८० कोटींचे वीज देयकप्रकरणी लिपिक निलंबित
3 टँकरमाफियांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा
Just Now!
X