सांगली : करोनाबाबत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती, पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

दोन दिवसापूर्वी भिडे यांनी करोना हा आजारच नसल्याचे सांगत जे जगण्याच्या लायकीचे नसतील ते मरतील असे धक्कादायक वक्तव्य केले होते. याबाबत आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांपासून ते सामान्य माणसापर्यंत सर्व जण करोनाविरुध्द लढा देत आहेत. असे असताना समाजाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. या वक्तव्याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

आंबा खाल्ल्यानंतर मुले होतात असे ते म्हणूनही, तोपर्यंत गांभीर्याने घेण्याची गरज वाटली नाही. मात्र करोनासारख्या गंभीर विषयाबाबत  भिडे यांनी केलेले विधान धक्कादायक आहे.