वाढत चाललेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळं महाराष्ट्रात सध्या काय स्थिती निर्माण झाली आहे, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. राज्यात करोनाची स्थिती दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे धोका कायम आहे. सरकार संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झटत आहे. मात्र, अपेक्षित असं यश येताना दिसत नाही. गेल्या आठ दिवसात करोनाग्रस्तांचा आकडा ३९ वर पोहोचला. त्यामुळे सरकारबरोबरच नागरिकांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. पण असा प्रश्न उपस्थित होत आहे की, याची सुरूवात झाली कशी. महाराष्ट्रात करोनाचा विषाणू येण्याला एक चूक कारणीभूत ठरली. त्यामुळे महाराष्ट्रावर ही स्थिती ओढवली आहे.

चीनमध्ये करोनाचा (कोव्हिड-१९) उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र, हवाई वाहतूक सुरूच होती. त्यामुळे हा विषाणू इतर देशात पोहोचला. भारतात आधी केरळमध्ये करोनाग्रस्त रुग्ण सापडले. तोपर्यंत देशाच्या इतर भागात कुठेही करोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. दरम्यान, १० मार्चला धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रात दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले अन् खळबळ उडाली.

नेमकं काय झालं?

परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याची व्यवस्था विमानतळांवर करण्यात आली आहे. मात्र, सुरूवातीला करोनाग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांचीच तपासणी करण्यात येत होती. या यादीमध्ये दुबईचं नावच नव्हतं. त्यामुळे दुबईतून येणाऱ्या नागरिकांची तपासणीच करण्यात येत नव्हती. याच काळात अचानक पुण्यातील दोघांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली. त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं.

एक ट्रिप आणि…

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं होतं की, ‘४० लोकांचा एक ग्रुप दुबईमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यामध्ये पुण्यातील दाम्पत्य होतं. ते १ मार्च रोजी भारतात परतले. दुबई करोना बाधित शहरांच्या यादीत नाही. त्यामुळे मायदेशी परतल्यानंतर त्यांचं विलगीकरण करण्यात आलं नाही. करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अहवालात त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि पुण्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला.’ इथेच ही चूक घडली. सरकारनं परदेशातून येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असता. तर करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात येण्यापूर्वीच निर्दशनास आले असते अन् आता निर्माण झालेला धोका टाळता आला असता.

आता पुढे काय? 

मुंबई आणि पुणे ही प्रचंड वर्दळ असलेली शहरे. पण, या शहरांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यानं करोनाच्या संकटामुळे मोठं आव्हानच निर्माण झालं आहे. मात्र, गर्दीतून होत असलेला करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता शासनानं कठोर धोरण स्वीकारलं आहे. गर्दी करण्याचे प्रयत्न होत आहे. लॉक डाऊन केलं नसलं तरी तशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवाच सध्या सुरू ठेवण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. करोना दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात गेला तर महाराष्ट्रात सरकारला लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागू शकतो.