सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. दुसऱ्या फेजमधून आपण तिसऱ्या फेजमध्ये जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारनेही कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या फेसबुक पेजवरुन महत्वाचे आवाहन केले आहे. करोनाला रोखण्यासाठी काय केले पाहिजे? काय काळजी घ्यावी? यासंबंधी फेसबुकवरुन महाराष्ट्र सैनिकांना काही सल्ले दिले आहेत.

आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगा. आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ आहे असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.