चीनसह जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणुची पुण्यातील पाच जणांना लागणं झाली आहे. सुरुवातील दोघांना लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. करोनाचा संसर्ग झालेल्या या दाम्पत्यासोबत बीडमधील तीन जण दुबईला गेले होते. सध्या आरोग्य विभाग त्यांच्यावर नजर ठेवून आहे.

महाराष्ट्रातील ४८ जण पर्यटनासाठी दुबईला गेले होते. ते सध्या भारतात परतले आहेत. दुबईला गेलेल्यांपैकी चार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्या दाम्पत्यानं ज्या कॅबमधून प्रवास केला. त्या चालकालाही करोनाची लागण झाली आहे. सध्या महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच आहे. दुबईला गेलेल्या या दाम्पत्यासोबत बीडचे तीन जण होते. हे तिघेही त्यांच्यासोबतच फिरण्यासाठी गेले होते. सध्या ते घरी परतले आहेत. आरोग्य विभागानं त्यांची तपासणी केली असून, त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षण आढळून आलेली नाही.

तरीही धोका कायम, कारण…

२८ दिवसांपर्यंत करोनाची लागण होण्याची भीती असते. त्यामुळे आरोग्य विभाग त्यांच्यावर नजर ठेवून आहे. त्यांना भारतात परतून दहा दिवस लोटले आहेत. अजून अठरा दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. जर करोनाची लक्षण दिसली, तर त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करून घेतलं जाणार आहे, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. दरम्यान, पुण्यातील त्या करोनाग्रस्त दाम्पत्यासह इतर तिघांवर पुणे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात कॅब चालकाला सोमवारीच दाखल करून घेण्यात आलं होतं. त्यांच्या तपासणीचा अहवाल मंगळवारी आला. त्यात त्याला करोनाचा संसर्ग झाल्याच स्पष्ट झालं.