सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना विषाणूचा कहर आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून तर त्यात वरचेवर वाढच होत आहे. रविवारी शहरात करोना संसर्ग होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर नवीन ३९ रूग्ण आढळून आले. ग्रामीण भागातही नवीन १७ रूग्णांची भर पडली. त्यामुळे शहर व जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या २,१२६ झाली असून मृतांचा आकडाही १८१ वर गेला आहे.

शहरात आज विविध ३७ ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ३९ संसर्गबाधित रूग्ण आढळून आले. ९ मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हे मृत ५८ ते ७७ वर्षे वयोगटातील आहेत. काल शनिवारीही करोना संसर्गबाधित ७ रुग्णांचा मृत्यू होऊन ४७ नवे रूग्ण सापडले होते.

दुसरीकडे जिल्हा ग्रामीण भागात आढळून आलेल्या १७ रूग्णांमध्ये १० रूग्ण शहरानजिक मुळेगावच्या पारधी वस्तीवरील आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील या वस्तीवर रूग्णसंख्या २५ वर पोहोचली आहे. याच तालुक्यातील कुंभारीच्या गोदूताई परूळेकर विडी घरकुलात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वरचेवर वाढतच आहे. एकूण १९६ पैकी ९१ रूग्ण एकाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेत.

तथापी, दुसरीकडे करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्याही वाढत असून शहरात करोनामुक्तांची संख्या १,०४२ (५३.९८ टक्के) झाली आहे. सध्या ७१८ रूग्ण सक्रिय आहेत.