उस्मानाबाद जिल्ह्यात विशेषतः उस्मानाबाद शहरात करोनाचा मोठ्या प्रमाणात कहर पाहावयास मिळत आहे.  एकूण करोना रुग्णांच्या संख्येत रविवारी संध्याकाळी आणखी ११ कोरोनाबाधितांची भर पडली. तर,आज दिवसभरात एकूण २४ रुग्णांची भर पडली आहे. रविवारी रात्री प्राप्त झालेल्या प्रलंबित रिपोर्टमध्ये कोविड सेंटरमधील एक फिजिशियन व एक बालरोग तज्ज्ञ असे दोन डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेत २५ जुलै रोजी पाठविलेल्या स्वॅबपैकी प्रलंबित ५३ रिपोर्ट्स रविवारी संध्याकाळी प्राप्त झाले. यामध्ये उस्मानाबाद शहरातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात बजाज हौसिंग सोसायटीतील ३ तर समता कॉलनी, लक्ष्मीनगर, माणिक चौक, सिव्हील क्वार्टरमधील एक बालक, माणिक चौक, तांबरी विभाग,महात्मा गांधी नगर, ख्वाजा नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर दोघांचे अहवाल संदिग्ध आले आहेत. उर्वरित ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, माणिक चौक येथे आढळून आलेल्या ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दिवसभरात मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली आहे.

२६जुलैच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ६५७ वर पोहचली असून ४२२ जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर १९७ जणांवर उचार सुरू असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.