सोलापूर शहरात शुक्रवारी करोना विषाणूने चारजणांचे बळी घेतले असून ५९ नवे बाधित रुग्ण आढळून आले, तर दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरूच असून पुन्हा एकाच दिवशी १६ रुग्ण दगावले असून नव्याने ५४९ बाधित रुग्णांची भर पडली. काल गुरुवारीही जिल्ह्यात १४ रुग्णांचा मृत्यू होऊन तब्बल ६९७ बाधित रुग्ण सापडले होते.

शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये ४७११ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ५४९ नवे बाधित रुग्ण सापडले. तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधित रुग्णसंख्या १६ हजार ७५ इतकी झाली असून मृतांचा आकडाही ४६८ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १० हजार ४९७ रुग्ण करोनामुक्त (६५.३० टक्के) झाले असून सध्या ५११० रुग्ण (३१.७८ टक्के) सक्रिय आहेत. मृत्यूचे प्रमाण २.९१ टक्के असून एकूण चाचण्यांच्या तुलनेने बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२.५३ टक्के इतके आहे.

सोलापूर शहरात जिल्हा ग्रामीणच्या तुलनेत मृतांची संख्या कमी म्हणजे ४४० असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र सहा टक्कय़ांच्या घरात आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णसंख्या ७३६३ एवढी झाली आहे. शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत एक लाख ९९ हजार १९२ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातून आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णसंख्या २३ हजार ४३८ एवढी झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा ९०८ वर पोहोचला आहे. शहरातील करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८३.१७ टक्के असून सध्या केवळ १०.८५ टक्के रुग्ण सRिय आहेत. शहर व जिल्ह्यात मिळून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७०.९१ टक्के झाले असून एकूण मृत्यूचे प्रमाण ३.८७ टक्के आहे.

पुन्हा टाळेबंदी नाही

सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा टाळेबंदी पुकारण्यात येणार नाही, असा निर्वाळा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला आहे. या संदर्भात केवळ अफवा पसरविण्यात असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात यापूर्वी २४ मार्चनंतर ७२ दिवसांची टाळेबंदी काटेकोरपणे अमलात आली होती. त्यानंतरही सोलापुरात पुन्हा १७ जुलैपासून दहा दिवस टाळेबंदी लागू झाली होती. बार्शीतही ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी लागली होती. परंतु आता पुन्हा शहर व जिल्ह्यात टाळेबंदी लागू होणार नाही, असे पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.