सोलापूरच्या जिल्हा कारागृहात करोना विषाणूचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात झाला असून शनिवारी आणखी १८ व्यक्तींना करोनाने बाधित केले आहे. त्यामुळे कारागृहातील एकूण बाधितांचा आकडा ७८ झाला आहे. कारागृहातील प्रचंड प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या संख्येमुळे करोना विषाणूचा शिरकाव होण्यास मदत झाल्याचे मानले जाते.

शनिवारी कारागृहातील ११ पुरुष आणि ६ स्त्रियांना करोनाची बाधा झाली. याशिवाय एक सुरक्षा कर्मचारीही बाधित झाला आहे. दरम्यान, करोना विषाणू फैलावामुळे जिल्हा कारागृह मूळ जागेवरून हलवून अक्कलकोट रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रशस्त इमारतींमध्ये आणण्यात आले आहे. तेथेच विलगीकरण कक्षाचीही उभारणी करण्यात आली आहे.

‘अ’ दर्जाच्या सोलापूर जिल्हा कारागृहातील कैदी ठेवण्याची क्षमता १४१ एवढी असताना प्रत्यक्षात तेथे जवळपास तिप्पट म्हणजे ४०१ कैद्यांना ठेवण्यात आले होते. तथापि, करोना भयसंकटाच्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४०१ कैद्यांपैकी ८४ कैद्यंना पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच गेल्या मे महिन्याच्या चौथ्या आठवडय़ात पॅरोलवर मुक्त होणाऱ्या एका कैद्याला करोनाने बाधित केल्याचा प्रकार प्रथमच उघडकीस आला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २८ मे रोजी याच कारागृहातील एका कर्मचाऱ्यालाही करोनाबाधा झाली. नंतर संबंधित कैद्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ करोनाचा प्रादुर्भाव वाढत जाऊ न बाधित रुग्णांचा आकडा वाढत ६० वर पोहोचला होता. यात ८ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १८ जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. कारागृहात प्रत्यक्ष राहणाऱ्या ११ पुरुष व ६ महिला तसेच एका सुरक्षा कर्मचाऱ्याला करोनाने ग्रासले आहे. त्यामुळे कारागृहातील बाधितांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. नव्याने आढळून आलेला कारागृह सुरक्षा कर्मचारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे पोलीस वसाहतीत राहतो. तो दररोज कारागृहात ये-जा करून नोकरी करतो. करोनाबाधित म्हणून त्याचा निवासाचा पत्ता मंद्रूप येथे दर्शविण्यात आला आहे.

ज्येष्ठ वयातील कैद्यांना धोका

कारागृहातील सर्व कैदी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून सर्वाच्या चाचणी नमुने घेण्यात आले आहेत. सद्यस्थितीत कारागृहातील कैद्यांपैकी ज्येष्ठ नागरिक असलेल्यांना करोना विषाणूचा अधिक धोका संभवत आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र दक्षता घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात कारागृह अधीक्षक डी. एस. इगवे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.